
सामना ऑनलाईन, महाड
नद्यांना आलेला पूर आणि सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे महाडमध्ये हाहाकार उडाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराला पुराचा वेढा पडल्याने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने छोटय़ा व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घरातील दाणापाणीही संपला आहे. सारा संसारच बुडाल्याने खाण्यापिण्याचेही वांदे झाले आहेत. धान्य, भाजीपाला तसेच दुधाचा पुरवठाही होत नाही. त्यामुळे चहादेखील प्यायला मिळणे मुश्कील झाले आहे. सलग पाचव्या दिवशी शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संकटात भर म्हणून वरंध घाट कोसळला असून शेकडो रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचा महाडशी संपर्क तुटला आहे. एनडीआरएफ टीमने धाव घेऊन हजारो ग्रामस्थांची सुखरूप सुटका केली.
मगर थेट पत्र्यावर चढली
चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे महाडमधील सुकट गल्ली पाण्याखाली गेली. सावित्री नदीपात्रातील मगरीदेखील शहरात घुसल्या आहेत. येथील घराच्या छपरावर एक मगर चढली होती. तिला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. ही मगर रात्रभर पत्र्यावरच होती. त्यामुळे घबराट उडाली.
अतिवृष्टीमुळे किल्ले रायगड घाट ढासळला असून चित्त दरवाजाजवळ मोठमोठय़ा दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली आहे.
महाड शहर व दादली गावाला जोडणाऱ्या पुलाला महापुरामुळे मोठे हादरे बसले. त्यामुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. त्याची दुरुस्ती तातडीने न केल्यास सावित्रीसारखी दुर्घटना होण्याची भीती आहे.
दादली गावात जाण्यासाठी पुलावरून फक्त दोन मिनिटे लागतात. मात्र हा पूल बंद असल्याने नडगाव ते नांगलवाडी, राजेवाडी, शिरगावमार्गे दादली गावात जावे लागत असून त्यासाठी 35 रुपये मोजावे लागत आहेत.
आंबेनळी घाटातील अवजड वाहतूक बंद
आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेनळी घाटालाही बसला. सुरक्षेच्या कारणामुळे दरडी हटविल्यानंतरही अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर माटवण गावातील पुरामध्ये अडकलेल्या अकरा ग्रामस्थांना एनडीआरएफच्या टीमने सुरक्षितस्थळी हलवले. वरंध घाटामध्ये मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे अतोनात हाल झाले.
दुरुस्तीसाठी लागणार सहा महिने
वरंध घाटात चार ते पाच ठिकाणी भल्यामोठय़ा दरडी कोसळल्या असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. घाटातील रस्ता दुरुस्त करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भिवंडीतील पिळंझे पूल कोसळला
भिवंडीच्या अनगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला पिळंझे पूल मुसळधार पावसाच्या तडाख्याने कोसळला. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र भवरपाडा, बंदरपाडा, नंबरपाडा, वारणापाडा, अडगापाडासह दहा आदिवासी पाडय़ांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा परिषदेने बांधलेला हा पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्या आश्चर्य व्यक्त होत असून रहिवासी तसेच विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत.


























































