
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण तालुक्यात गेले दोन दिवस कोसळणार्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. आडवण भागातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने नागरिकांना रात्रभर जागता पहारा ठेवावा लागला. झाडे, विद्युत खांब कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वीज पुरवठाही खंडित झाला. खैदा येथील रस्त्यावर डोंगरातील दगड कोसळल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. मालवणात जिल्ह्यातील सर्वाधिक ४९१ मिलिमीटर पावसाची नोंद दिवसभरात झाली आहे.
जिल्ह्यात मान्सूनचे धडाक्यात आगमन झाले. पावसाचा धडाका दुसर्या दिवशीही कायम आहे. दिवस-रात्र कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. देऊळवाडा पुलानजीकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. या भागातील काही नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी घुसले. दरवर्षी याठिकाणी पाणी साचत असल्याने यावर प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करावी अशी संतप्त मागणी स्थानिकांनी केली आहे.
रेवतळे भागातही पाणी घुसले घरात
सागरी महामार्गानजीक एका खासगी मालमत्तेच्या ठिकाणी जाण्यासाठी अनधिकृतपणे नवीन मार्ग बनविण्यात आला आहे. यामुळे येथील प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कार्यवाही न झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काल रात्रभर कोसळणार्या मुसळधार पावसामुळे त्याठिकाणी पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर अडथळे निर्माण होऊन रेवतळे भागातील घरांमध्ये पाणी घुसले. याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका शीला गिरकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने अडथळा दूर केला.
झाडे कोसळली वीज खांब व तारांवर
शहरातील धुरीवाडा तसेच अन्य भागात माडाची झाडे विद्युत तारांवर कोसळल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नगरसेवक यतीन खोत यांनी पालिका कर्मचार्यांच्या मदतीने ही झाडे हटविण्याची कार्यवाही केली. विद्युत खांब तसेच तारा तुटल्याने महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देवबागमध्ये आंब्याचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. गावातील तीन विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.
वाहून जाणाऱ्या होड्या बांधून ठेवल्या
पावसाचा फटका ‘मोरयाचा धोंडा’ नजीकच्या समुद्रकिनाऱ्याला सुद्धा बसला. वायरी व दांडी भागातून वाहत येणारे पावसाचे पाणी मार्ग बदलत सुमारे दोनशे मीटर्स अंतर पुढे वाहत जात समुद्राला मिळाले. त्यामुळे काही ठिकाणी वाळू वाहून होड्याही वाहून जाऊ लागल्या. या होड्या मच्छीमारांनी बांधून ठेवल्या. नगरसेवक पंकज सादये, आरोग्य सभापती आप्पा लुडबे सह महेंद्र पराडकर व सहकाऱ्यांनी प्रचलित ठिकाणी चर पाडून पाण्याच्या प्रवाहाची वाट मोकळी केली.






























































