
परतीच्या पावसाचा जोर मराठवाडा विभागात अद्याप कायम असून, या विभागातील 7 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे विभागातील धरणांचा मृतसाठा जिवंत होण्यास मदत झाली असली तरीही शेतकऱ्यांच्या हाती लागणाऱ्या खरीप पिकांना मात्र जबर फटका बसला आहे. या पावसामुळे मका, सोयाबीन आणि कापूस ही पिके नेस्तनाबूत झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा परवड आली आहे.
मराठवाडा विभागाला यंदा मोसमी पावसाने तशी हुलकावणीच दिली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पाऊस वेळेवर आणि समाधानकारक झाला नाही. वेळ चुकवून झालेल्या पावसाची वार्षिक सरासरी 85.45 टक्क्यांवर पोहचली आहे. ही परतीच्या पावसाची किमया आहे. विभागाला परतीच्या पावसाने झोडपून काढणे सुरू केले आहे. हा पाऊस धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत करणारा असला तरीही त्याचा जबरदस्त फटका हाती येणाऱ्या खरीप पिकांना बसला आहे.
परतीच्या पावसाचा जोर कायम आहे़ गेल्या चोवीस तासांत मराठवाड्यातील 7 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी-74, वडीगोद्री-81, परभणी जिल्ह्यातील बामणी मंडळात 75 मि. मी. पाऊस झाला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील वडवणी मंडळात 98 मि.मी., कौडगाव बु.-103, लातूर जिल्ह्यातील चाकूर-90 आणि वडवळ ना. मंडळात-74 मि. मी. पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाने मध्यम, लघु प्रकल्पांत पाण्याचा साठा होत असून, विभागातील मोठ्या धरणांचा मृतसाठा जिवंत होण्यास मदत झाली आहे.
या परतीच्या पावसाने मृतसाठा जिवंत होत असला तरीही त्याची जबर किंमत शेतकऱ्यांनाच मोजावी लागत आहे. हाती येणारी खरिपाची पिके नेस्तनाबूत झाली आहेत. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस आणि मका पिकांना बसला आहे. अगोदर भीषण दुष्काळाच्या संकटातून शेतकरी बाहेर पडत नाही तोच परतीच्या पावसाने नुकसान होत असलेल्या परिणामाला सामोरे जाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
पावसाची वार्षिक सरासरी
जिल्हा वार्षिक टक्केवारी
संभाजीनगर – 97.01
जालना – 89.50
परभणी – 87.19
हिंगोली – 70.64
नांदेड – 95.57
बीड – 75.67
लातूर – 83.12
धाराशिव – 85.41
सरासरी – 85.45





























































