रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; उक्षीत घरावर दरड कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढगांचा गडगडाटासह मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला शनिवारी पुन्हा झोडपले. सलग दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर उक्षी येथे एका घरावर दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झालेली नाही.

रत्नागिरी तालुक्यातील ऊक्षी बौद्धवाडीतील स्वप्नाली कांबळे यांच्या घराच्या मागील बाजूला असलेली दरड कोसळली. स्वप्नाली कांबळे व संजय कांबळे यांच्यासह घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. नायब तहसीलदार, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्कल व तलाठी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने दोन कुटुंबांचे स्थलांतरण केले आहे.

जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात मंडणगडमध्ये 64.80 मिमी, दापोलीत 26.50 मिमी, खेडमध्ये 45.10, गुहागरमध्ये 47.30 मिमी, चिपळूणमध्ये 59.20 मिमी, संगमेश्वरात 42.00 मिमी, , रत्नागिरीत 55.20 मिमी, राजापूरमध्ये 58.40 मिमी तर लांजामध्ये 55.30 मिमी. पावसाची नोंद झाली.

रत्नागिरी तालुक्यात मौजे पानवल येथे स्वप्निल अनंत कांबळे त्यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून अंशतः नुकसान झाले आहे . या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.