संगमेश्वर तालुक्यात ढगांच्या गडगडासह पावसाचे दमदार आगमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह संगमेश्वर तालुक्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. शनिवारीपासून सलग सुरू असणाऱ्या पावसामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. संगमेश्वर देवरुख मार्गावरील कोसुंब येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. जवळपास सहा तास सलग झालेल्या पावसाने टंचाईग्रस्त भागासह, शेतकरी आणि तालुकावासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.

शनिवारी रात्री संगमेश्वर तालुक्याच्या साखरपा, देवरुख, संगमेश्वर, आरवली, कडवई, माखजन, करजुवे, कसबा, फणसवणे, नायरी, वाशी, पाचांबे, धामणी, तुरळ या गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी केलेले शेतकऱ्यांचे गेले आठ दहा दिवस पावसाच्या दमदार आगमनाकडे लक्ष होते. त्यामुळेच पावसाच्या दमदार आगमनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे संगमेश्वरनजीक गांवमळा आणि कुरधूंडा बंदर या दोन ठिकाणी दरड आणि मोठ्या प्रमाणावर माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी तातडीने जेसीबी आणि अन्य यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने दरड दूर करण्याचे काम हाती घेतले आणि तासाभरातच महामार्गावरील वाहतूक मंदगतीने आणि एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.