मान्सूनचा आणखी दहा दिवस मुक्काम; पुढील चार-पाच दिवस मुसळधार कोसळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर हिंदुस्थानात धुमशान घालत असलेला मान्सून देशातून लवकर माघार घेणार नाही. आणखी किमान दहा दिवस मान्सूनचा मुक्काम असेल. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अॅलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पुढचे दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, मंगळवारी गुजरातच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा, विदर्भ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अंदमान-निकोबार, आसाम, मेघालय, सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणा, तामीळनाडू, पुद्दुचेरी आदी भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागेल. पुढील चार ते पाच दिवस विविध राज्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आदी भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढेल. महाराष्ट्रासाठी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचे असतील, असे कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुते यांनी सांगितले.