
सामना प्रतिनिधी । ठाणे
काळजाचा थरकाप उडवणारा मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेले पूर यामुळे ठाणे जिह्यात हाहाकार उडाला आहे. ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी पुलाचे भाग कोसळले असून रस्तेही खचले आहेत. त्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला. जनजीवन ठप्प झाले आणि दोन दिवसांत होत्याचे नव्हते झाले. या पुरात शेकडो हेक्टर शेती वाहून गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगुरूनगर मार्गे भीमाशंकरकडे जाणार्या मंदोशी घाटात रस्ताच वाहून गेला, तर कल्याणजवळील रायते पुलाला भगदाड पडले. त्यामुळे कल्याण-नगर मार्ग ठप्प झाला. कसारा घाटातही रस्त्याला तडे गेल्याने वाहनचालकांचे अतोनात हाल झाले.
बदलापूर-कर्जत मार्गावरील लोकल वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. अंबरनाथमधील काकोले जीआयपी धरणाची संरक्षक भिंत फुटल्याने आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. धो-धो पावसामुळे अस्मानी संकटच कोसळले आहे.
27 गाईंचा तडफडून मृत्यू
उल्हास नदीला आलेला पूर एवढा भयंकर होता की, त्याचा सर्वाधिक फटका रायते गावाला बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले. या पुराचे पाणी केडिया फार्म हाऊसमध्ये शिरले. तेथील गोठ्यात बांधलेल्या 27 गाईंचा तडफडून मृत्यू झाला.
कसारा घाटातील रस्त्याला पडलेले तडे, उल्हास, वालधुनी नद्यांना पूर
पूर जोरदार पावसामुळे ठाणे जिह्यात मोठे नुकसान झाले असून उल्हास व वालधुनी नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी हजारो नागरिकांच्या घरात घुसल्याने प्रचंड नुकसान झाले.
रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो चाकरमान्यांना मोठा फटका बसला. कल्याण-बदलापूर मार्गावरील वाहतूक पुरामुळे दोन दिवस ठप्प होती. कल्याण स्थानकातून कर्जतकडे आज रात्री साडेआठच्या सुमारास पहिली लोकल सुटली. सिग्नल यंत्रणा दोन दिवस बिघडली आहे. शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस होते. मात्र उद्या सोमवार कामाचा पहिला दिवस असल्याने सिग्नल यंत्रणा दुरुस्त न झाल्यास पुन्हा रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे आहेत.
वेल डन! बिग बींकडून कौतुक
मुंबईहून कोल्हापूरला जाणार्या महालक्ष्मी एक्प्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करणार्या एनडीआरएफ टीमचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘वेल डन एनडीआरएफ!’ अशा शब्दांत कौतुक केले आहे.
एनडीआरएफच्या कामगिरीबाबतचे ट्विट करताना अमिताभ यांनी म्हटलेय, ‘एनडीआरएफचे अभिनंदन! त्यांनी महालक्ष्मी एक्प्रेसमध्ये अडकलेल्या 700 प्रवाशांची सुटका केली. वेल डन! एनडीआरएफ, वायुदल, नौदल, रेल्वे यांनी चांगली कामगिरी केली. हे एक साहसी आणि यशस्वी ऑपरेशन होते. जय हिंद!’
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेले अमिताभ बच्चन ट्विटरच्या माध्यमातून त्यांची मते व्यक्त करतात तसेच इतरांच्या कामांची प्रशंसा करताना दिसतात हे आजच्या त्यांच्या ट्विटमधून पुन्हा एकदा दिसून आले आहे.





























































