
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात रविवारपासून पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. पावसामुळे बियास नदीला पूर आला आहे. पुरामुळे पालचन आणि नेहरूकुंडपासून कुल्लूपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहंगमध्ये दुकाने आणि रेस्टॉरंट्स वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. मनाली कुल्लू राष्ट्रीय महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाचा तीन किलोमीटर भाग पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे.
पावसामुळे सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. दुवाडा जवळील बियास नदीवरील पादचारी पूलही नदीच्या प्रवाहामुळे कोसळला. बियास नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळी लक्षात घेता पांडोह धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सुमारे 90 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.
सततचा पाऊस, भूस्खलन आणि नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे कुल्लू-मनाली परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, परंतु बियास नदीच्या जलद प्रवाहामुळे धोका वाढला आहे. बियास नदीत आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बहंग, तिबेटीयन कॉलनी, व्होल्वो स्टँड, पोटॅटो ग्राउंड, क्लॉथ, बिंदू धोग, 18 मील आणि रायसन परिसरात नुकसान झाले आहे. तिबेटीयन कॉलनी, व्होल्वो स्टँड, बिंदू धोग, रायसन येथील रस्ता पूर्णपणे पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे कुल्लू मनाली रस्ता अनेक ठिकाणी पूर्णपणे बंद झाला आहे. हिमवृष्टी आणि पावसामुळे मनाली लेह रस्त्याचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.