
क्यार चक्री वादळाचा मोठा फटका सलग दुसऱ्या दिवशी मालवण किनारपट्टीला बसला आहे. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण जलमय झाले. बाजारपेठेत पाणी घुसले, अनेक रस्ते पाण्याखाली गेले. अनेक घरांना पाण्याने वेढा दिला होता. त्या तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ बंद होती.
दरम्यान, किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर कायम होता. तर जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत असल्याने ग्रामस्थ सलग दुसऱ्या दिवशी भीतीच्या छायेत होते. समुद्रात घोंगवत असलेले चक्रीवादळ शुक्रवारी रात्री किनारपट्टीच्या दिशेने असल्याने त्याचा फटका मालवण किनाऱ्यावर सर्वाधिक बसला. अनेक मच्छिमारांनी आपल्या होड्या सुरक्षित स्थळी हलवल्या मात्र काही मच्छिमार व पर्यटन व्यावसायिक यांच्या होड्या समुद्रात असल्याने होड्या, जाळी व पर्यटन साहित्याचे नुकसान झाले. पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. देवबाग येथील बंधारा उध्वस्त झाला असल्याने उधानाचे पाणी थेट वस्तीत घुसत होते.
भातशेतीचे मोठे नुकसान
सिंधुदुर्गातील प्रमुख पीक असलेली भातशेती अवकाळी स्वरूपातील धुंवाधार पावसाने पूर्णपणे कुजून गेली. तयार झालेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वार्षिक पुंजी व कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणून ज्या भातशेतीकडे पाहिले जाते. ती शेती वाहून गेल्याने आता करायचे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा राहिला आहे.
एका दिवसात 250 मिलीमीटर पाऊस
शुक्रवार सायंकाळ पासून रात्रभर पावसाने अक्षरशः मालवणला झोडपून काढले. रात्रभर कोसळलेल्या पावसाने शनिवारी सकाळी मालवण पूर्णपणे जलमय झाले होते. दिवसभरात 250 मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद होती. शनिवारी दुपार नंतर पावसाने काहीशी उसंत घेतली.






























































