
यंदा दीर्घकाळ मुक्कामाला राहिलेल्या पावसाने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर काढता पाय घेतला असा समज करून घेणाऱया मुंबईकरांची पावसाने शुक्रवारी पुन्हा एकदा चांगलीच तारांबळ उडवली. किनारपट्टी भागातील ‘महा’चक्रीवादळामुळे भरकटलेला हा पाऊस तिन्ही सांजेला विजांच्या कडकडाटासह थेट मुंबईत येऊन धडकला. परिणामी, कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची कुठे स्थानकात, तर कुठे दुकानांच्या आडोशाला अशी तास-दीड तास रखडपट्टी झाली.
मुंबई शहर व उपनगरात गेले दोन-तीन दिवस कमाल तापमानाने 36 अंशांची पातळी गाठली होती. याचदरम्यान पावसाची पुन्हा हजेरी लागेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. किनारपट्टी भागात ‘क्यार’ चक्रीवादळापाठोपाठ ‘महा’चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारी सायंकाळी मुंबई शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. दादर, प्रभादेवी, कुलाबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, चर्चगेट, मरीन लाइन्स, महालक्ष्मी, जुहू आदी परिसरात या पावसाचा जोर अधिक होता. नोव्हेंबर महिना उजाडल्याने आता काही पाऊस पडणार नाही असा समज करून घेतलेल्या मुंबईकरांनी छत्रीला घरीच विश्रांती दिली होती. मात्र याच मुंबईकरांना पावसाने पुन्हा एकदा घरातील छत्री बाहेर काढायला लावली आहे.
आणखी एक दिवस पावसाचा मुक्काम
मुंबईसह गोवा, कोकण किनारपट्टी भागात आणखी एक दिवस ‘महा’चक्रीवादळाचा प्रभाव कायम राहील. त्यामुळे शनिवारीही मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पाऊस जोरदार हजेरी लावेल, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.


























































