पावसाची नाकाबंदी, मुंबई, ठाणे ठप्प… कोकण, नाशकात कोसळधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, रायगड, कोकण, पुणे, नाशिक आणि मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाने आज झोडपून काढले. पावसामुळे ठिकठिकाणी रेल्वे ट्रकवर पाणी साचले तसेच कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा बिघडल्याने मध्य व हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प पडली. पातळी ओलांडलेल्या भातसा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ठाणे, भिवंडीत सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई, विरार, पालघर पट्टय़ातही पावसाने थैमान घातले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात वादळी वाऱयासह पाऊस कोसळत आहे. पुण्यातही धरणे भरली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्ये गोदावरीला पूर आल्याने रामसेतू पाण्याखाली गेला होता. कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी गाठल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात ‘हाय ऍलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईत पावसाने 118 वर्षांचा विक्रम मोडला

मुंबईत पावसाने जुलै महिन्यातला गेल्या 118 वर्षांचा विक्रम मोडला आहे. सांताक्रुझ वेधशाळेत जुलै महिन्यात 1474 मिमी पावसाची नोंद झाली. 1901 नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात इतका पाऊस नोंदला गेला. मुंबईत आतापर्यंत एकूण पर्जन्यमानापैकी 91 टक्के पाऊस झाला आहे.

मुंबईतील पावसाची नोंद

दिंडोशी – 50 मिमी, कांदिवली – 41 मिमी, मालाड – 36 मिमी, चिंचोली – 36 मिमी, गोरेगाव – 33 मिमी, भांडुप – 31 मिमी, बोरिवली – 29 मिमी, मालवणी – 26 मिमी, मुलुंड – 20 मिमी, विक्रोळी – 11 मिमी, कुर्ला – 9 मिमी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स – 32.75 मिमी, अंधेरी पूर्व – 90.40 मिमी, घाटकोपर पूर्व 33.2 मिमी, बोरिवली रेल्वे स्थानक 128 मिमी, दहिसर चेकनाका – 133.32 मिमी, मुंबई विमानतळ – 52.59 मिमी, कुर्ला कमानी – 50.79 मिमी

मध्य, हार्बर मार्गावर प्रवाशांचे मेगाहाल

मुसळधार पावसामुळे शीव, ठाणे, चुनाभट्टी, वडाळा येथे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक कोलमडली. त्यातच दुपारी दोनच्या सुमारास कुर्ला येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल जागीच थबकल्या. धिम्या आणि जलदगती मार्गावर लोकल एकापाठोपाठ एक खोळंबल्या होत्या. कल्याणहून येणाऱया लोकल ठाणे येथेच थांबवण्यात आल्या. परिणामी प्रवाशांना मेगाहाल सहन करावे लागले. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडले. लोकल वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांना विद्याविहार येथेच रेल्वे ट्रकवर उतरून कुर्ल्यापर्यंत पायपीट करावी लागली. हातात छत्री घेऊन ट्रकवर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना त्यांची पुरती दमछाक झाली होती. कुर्ला स्थानकाजवळ बाहेर पडल्यानंतर त्यांनी बेस्ट आणि खासगी वाहतुकीचा मार्ग पत्करला. त्यामुळे बेस्ट बसेसमध्येही प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी मुलुंड आणि वाशीपर्यंत जादा गाडय़ा सोडल्या, पण प्रवाशांच्या संख्येपुढे त्यासुद्धा अपुऱया पडल्या.

सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा फटका लांब पल्ल्याच्या गाडय़ांनाही बसला. चेन्नई एक्स्प्रेस कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान खोळंबून राहिली. त्यानंतर सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाल्याने अडीच तासांनंतर सायंकाळी 5.20 वाजता दादर येथून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. पण हार्बर मार्गावरील प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले. चेंबूर स्थानकाजवळील पुलाखाली रेल्वे रुळावर पुलाच्या दुभाजकाचा काही भाग कोसळल्याने हार्बर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कुणी जखमी झाले नाही. रेल्वे कर्मचाऱयांनी रुळांवर पडलेले दुभाजकाचे दगड बाजूला केले. सावधगिरी म्हणून संबंधित पुलावरील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. जोरदार पावसाचा परिणाम मेट्रो आणि मोनोरेलवरही जाणवला. तांत्रिक कारणामुळे मोनोरेलची वाहतूकही काही काळ बंद पडली होती आणि मेट्रो रेल्वेचाही वेग मंदावला होता.खोळंबलेल्या प्रवाशांसाठी पालिकेकडून

शाळांमध्ये व्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाणे आणि वाशीपर्यंत जाणारी लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि कुर्ला येथे खोळंबलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने विविध शाळांमध्ये पाणी, चहा आणि अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये खोळंबलेल्या प्रवाशांसाठी महापालिकेने बोरा बझार येथील मनोहरलालजी स्कूलमध्येविशेष व्यवस्था करण्यात आली होती.