परतीच्या पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर तालुक्यासह परिसरातील येलदरी, मुरूमखेडा हिवरखेडा, सावंगी म्हाळसा, आंबरवाडी, शेवडी, इटोली, सावळी आदी भागात परतीच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. या भागांमध्ये कापणीला आलेल्या सोयाबीनची काढणी चालू असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन कापुन ठेवले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन मोठ्या प्रमाणात भिजले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अजून 2 दिवस पाऊस राहणार असल्यामुळे हे सोयाबीन हाती लागेल की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.

परतीच्या पावसाने शनिवार, 19 ऑगस्ट रोजी तालुक्याला झोडपले. तालुक्यात 2 दिवसांपासून पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाला आलेले सोयाबीन कापसाचे नुकसान झाले आहे. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली तालुक्यात दिवाळी सण-उत्सवाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. काही शेतकरी आपला माल विकून मोकळे झाले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला उशीर झाला अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी बाकी आहे. त्यातच पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जात आहे.

या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे चांगले आलेले कापसाचे पीक जास्तीच्या पावसामुळे खराब होत आहे पाते आणि बोड गळून पडत आहे. पावसाचा जोर एक दोन दिवस असाच राहिला तर कापुस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका सहनक करावा लागणार आहे. दरम्यान, यापावसामुळे येलदरी धरणाच्या वरील खडकपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने खडकपूर्णा धरणाचे 5 दरवाजे सोडण्यात आले असून त्यामधून 3440 क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे हे पाणी येलदरी धरणात येणार असून त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. सध्या येलदरी धरणात 12 टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

आज रोजी दुपारी 2.45 वाजता खडकपूर्णा प्रकल्पाची 1,9,10,11 व 19 ही 5 वक्रद्वारे 20 सेमीने उघडली आहेत. नदीपात्रात 4 हजार 920 क्यूसेक एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.