मुंबईत पावसाचा जोर वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सोमवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुपारनंतर ओसरला. बुधवारी दिवसभर संततधार आणि अधूनमधून एखादी जोरदार सर बरसली. मात्र मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

बुधवारी दुपारी सोसाटय़ाचा वारा सुटल्याने मुंबई पोलीस आयुक्तालयातील एक झाड कोसळले. अपर पोलीस आयुक्तांच्या गाडय़ांवर झाड पडून नुकसान झाले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.

तलावक्षेत्रातही चांगला पाऊस
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावक्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे. विहार तलावात १६ मि.मी. तर तुलसी तलावात१७ मि.मी., भातसा आणि वैतरणात तलावात ४ मि.मी. तर अप्पर वैतरणा ७ मि.मी., तानसा ३ मि.मी. , मध्य-वैतरणा ६ मि.मी. आणि वैतरणामध्ये ४ मि.मी. इतक्या पावसाची तर भांडुपमध्ये १५ मि.मी. नोंद झाली. तलावक्षेत्रातील पाण्याची पातळी वाढली असून येत्या २४ तासांत जोरदार पाऊस होणार असल्यामुळे तलाव भरून वाहाण्याची शक्यता आहे.

– दिवसभरात कुलाब्यात ७३.० मि.मी. पावसाची नोंद झाली तर सांताक्रुझमध्ये ११८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली.
-कुलाबा वेधशाळेने येत्या २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी पडत राहतील तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरी पडतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
-कोकण,गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.