
सामना प्रतिनिधी, मुंबई
गेल्या 35 तासांपासून राज्यभरात धुमाकूळ घातलेल्या पावसाने आज अक्षरशः रुद्रावतार धारण केला. मुंबईसह उपनगरे, ठाणे, पुणे, नाशिक, कोकणात धुवांधार कोसळल्याने रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही ठप्प झाली. ठाणे जिह्यातील उल्हास, भातसा आणि बारवी या नद्या, पुण्यात मुठा नदी, खडकवासला, पानशेत, मुळशी, वरसगाव धरण, नाशकात नांदूर मधमेश्वर धरण, साताऱ्यात संगम माहुलीला आलेल्या पुरामुळे सगळीकडे हाहाकार माजला. जनजीवन विस्कळीत झाले.
अनेक गावांना पुराने वेढले. मुख्य बाजारपेठांशी संपर्क तुटला. घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले. मंदिरे पाण्याखाली गेली. मुंबई-नाशिक महामार्गावर रस्ता खचला. पेणजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली. लांबपल्ल्याच्या अनेक रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या. सिग्नल यंत्रणा बिघडल्याने आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने मध्य-हार्बरवरची लोकल वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली. मुंबईत विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली. दरम्यान, येत्या 48 तासांत पावसाचा जोर असाच कायम राहणार असून हवामान विभागाने ऑरेंज ऍलर्ट दिला आहे. किनारपट्टीवर वाऱयाचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
शेलू आणि नेरळदरम्यान रुळाखालील खडी वाहून गेली. त्यातच कल्याण-कर्जतची सिग्नल यंत्रणा पाण्यात गेली. त्यामुळे हा मार्ग दोन दिवस बंदच राहण्याची शक्यता आहे.
आज शाळा, कॉलेज बंद
सोमवारीही पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, नाशिक, रायगड आणि रत्नागिरीतील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत 2200 मिमी पाऊस
मान्सूनला सुरुवात झाल्यापासून 45 दिवसांत 89 टक्के पाऊस पडला असून या दरम्यान मुंबईत 2200 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.





























































