कोल्हापुरात अतिवृष्टी; पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर, सर्वच धरणांतून विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली असतानाच, मध्यरात्रीपासून अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. यंदा दुसऱयांदा सकाळी पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले असून, नद्या-नाल्यांना पूर आला आहे. सायंकाळी सातपर्यंत पंचगंगेच्या पातळीत 14 फुटांची वाढ होऊन, ती 34.4 फूट झाली होती. दिवसभरात तब्बल 54, तर एकूण 66 बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान, करुळ घाटात रस्ता खचल्याने सर्व प्रकारची वाहतूक रात्रीपासूनच बंद करून ती भुईबावडा घाटामार्गे वळविण्यात आली. करंजफेन व कांटे शिवजवळ वारंगमळी येथे पाणी आल्याने कोल्हापूर-राजापूर वाहतूक बंद झाली. तसेच, बर्की पुलावरही पाणी आल्याने बर्की धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. शिवाय 7 इतर जिल्हामार्ग व 11 ग्रामीण मार्ग असे एकूण 18 मार्ग बंद झाले होते.

जिह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर सुरू झाला. रात्रभरात चार फुटांची वाढ होऊन सकाळी पंचगंगेची पातळी 24 फूट झाली होती. सकाळपासून धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी सुरू झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे कासारी, कुंभी तसेच वारणा धरणातूनही आज सकाळी विसर्ग वाढविण्यात आला. परिणारी पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. दुपारी साडेबारापर्यंत पंचगंगेची पाणीपातळी थेट 31 फुटांवर पोहोचली. 11 ते 12.30 या दीड तासात तब्बल साडेपाच फुटांची वाढ झाली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगेची पातळी 34.1 फूट झाली होती. पंचगंगेची वाटचाल 39 फुटांच्या इशारा पातळीकडे सुरू होती.

राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता
राधानगरीसह प्रमुख धरणे सध्या 90 ते 100 टक्के भरली आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास दूधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार दरवाजे उघडले असून, त्यातून 423 तसेच पॉवर हाऊस मधून एक हजार क्यूसेक असा एकूण 1 हजार 423 क्यूसेक विसर्ग सुरू होता. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असून, धरणात मोठय़ा प्रमाणात पाणी जमा होत असल्याने आज रात्री उशिरा वा उद्या दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

पन्हाळा किल्ल्याला पुन्हा भूस्खलनाचा तडाखा
गेल्या एक-दोन वर्षांत झालेल्या मुसळधार व अतिवृष्टीमुळे ऐतिहासिक किल्ले पन्हाळा किल्ल्याला भूस्खलनामुळे मोठी हानी झाली. नुकताच चार दरवाजा येथील रस्ता दुरुस्त करून वर्षभरापासून बंद पडलेली वाहतूक सुरू झाली होती. मात्र, यंदाच्या पावसातही चार दरवाजा परिसरात पुन्हा एकदा भूस्खलन होऊन जुन्या ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण झाला आहे. आज सकाळी पुन्हा एकदा चार दरवाजा पायथ्याशी भूस्खलन होत असल्याने पायथ्यालगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करून ऐतिहासिक पन्हाळा किल्ला ढासळण्यापासून वाचविण्याचे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

साळगाव बंधारा पाण्याखाली; चित्रीही भरले
आजरामध्ये गेले पंधरवडाभर दडी मारलेल्या पावसाचा कहर शनिवारपासून पुन्हा सुरू झाला आहे. यामध्ये प्रतीक्षेतील चित्री मध्यम पाटबंधारे प्रकल्प आज सकाळच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला आहे. तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे हिरण्यकेशी व चित्री नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तर, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा दुसऱयांदा पाण्याखाली गेला आहे. यामुळे आजरा ते पेरणोली व देवकांडगाव मार्गावरील वाहतूक सोहाळेमार्गे वळविण्यात आली.

तुळशी धरणातूनही विसर्ग सुरू होणार
राधानगरीःगेल्या तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात कोसळणाऱया जोरदार पावसासह लगतच्या केळोशी लघुपाटबंधारे प्रकल्पात येणाऱया अतिरिक्त पाण्यामुळे धामोड येथील तुळशी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार असल्याची माहिती शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली. तुळशी धरणक्षेत्रात गेल्या 12 तासांत 73 मिमी पाऊस झाला आहे. 616.91 मीटरला धरण पूर्ण क्षमतेने भरत असून, सायंकाळी पाच वाजता 613.75 मीटर पाणीपातळी झाली आहे.

नागणवाडी धरण पहिल्याच वर्षी ओव्हरफ्लो
गारगोटीः भुदरगड तालुक्यातील चार गावे आणि कागल तालुक्याला वरदान असणारा चिकोत्रा नदीवरील नागणवाडी (बारवे-दिंडेवाडी) लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यावर्षी पहिल्यांदाच या धरणात पाणी साठवण्यात आले असून, पहिल्याच वर्षी हा प्रकल्प भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून भुदरगड तालुक्यात विशेषतः धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असून, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 8.1604 दशलक्ष घनमीटर इतका असून, पूर्ण संचयपातळी 124.50 मीटर इतकी आहे. हे धरण 100 टक्के भरले असून, सांडव्यावरून 257.80 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.