वालूरच्या बारवेची राष्ट्रीय स्तरावर दखल! ग्रामस्थांच्या श्रमदानातून वैशिष्ट्यपूर्ण बारव पुनर्जीवित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
helical-stepwell-valur-maha

वालूरची ‘हेलीकल स्टेपवेल’ची महाराष्ट्रभर चर्चा सूरू झाली असून राज्याच्या पुरातत्व खात्याकडून तिला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी वरिष्ठांना तसे आदेशही निर्गमीत केल्याचे समजते.

वालूर ग्रामस्थांनी गावातील प्राचिन वारसा संवर्धनाचे कार्य हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून बारव बचाव समिती गठीत केली. समितीच्या वतिने श्रमदानातून गावातील वैशिष्ट्यपूर्ण बारवेला पुनर्जिवीत केले आहे.

अशी झाली सुरूवात

जिल्हा प्रशासनाच्या 28 एप्रिल रोजी ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीच्या वतिने गावात बैठक घेण्यात आली होती. सेलू उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार समितीचे समन्वयक सुनील पोटेकर, सदस्य मल्हारिकांत देशमुख, अनिल स्वामी यांनी गावक-यांशी चर्चा केली. गावातील प्राचिन मंदिरं, बारवांचे सर्वेक्षण केले. श्रमदानाची वातावरण निर्मिती करीत पाठपुरावा चालविला. वालूरचे सरपंच संजय साडेगांवकर, प्रतिष्ठीत व्यापारी शैलेश तोष्णीवाल यांनी हे अभियान यशस्वी करण्याचा निर्णय घेतला.

तरुणाई एकवटली

वालूर येथील रहिवाशी परंतू औरंगाबाद जि. प. मध्ये उपकार्यकारी अधिकारी असणारे डॉ. सुनील भोकरे हे शनिवारी गावी आलेले होते त्यांनी माणकेश्वर मंदिरात बैठक घेवून युवकांना श्रमदानाबाबत प्रेरित केले आणि गावातली तरुणाई एकवटली. पहिल्या दिवशी बारवेवरील काटेरी झाडं झुडपं तोडल्यानंतर या कलात्मक वास्तूची महती लोकांना पटली आणि अभियानाला गती आली.

रात्रीला लाईट लावून श्रमदान

उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता श्रमदान रात्रीच्या वेळी करण्याचे ठरले. वालूर ग्रामपंचायतने बारवा परीसरात लाईटची व्यवस्था केली. घंटागाड्या, पाण्याचे टँकर बोलावण्यात आले. रविवारी सायंकाळी सात ते रात्री साडेअकरा पर्यंत शंभरावर श्रमदाते कामाला भिडले. रात्रभरातील परिश्रमातून ‘हेलीकस स्टेप्स वेल’ जगासमोर आली. अशाच प्रकारच्या बारवा हम्पी (कर्नाटक) व चंपानेर (गुजराथ) येथे आहेत. चंपानेरची ‘हेलीकल’पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होय. वालूर येथील बारवस्थापत्य त्यापेक्षाही हटके आहे. या बारवेत देवकोष्ट (देवळ्या) आहेत. यात जलदेवतांच्या मुर्ती ठेवलेल्या असायच्या.