केरळमध्ये हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग; लुलू उद्योग समूहाचे प्रमुख युसूफ अली पत्नीसह बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या पनांगड भागात रविवारी एका खासगी हेलिकॉप्टर्सला आपत्कालीन स्थितीत दलदलीत क्रॅश लँडिंग करावे लागले. सुदैवाने या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे लुलू उद्योग समूहाचे प्रमुख आणि केरळचे नामवंत उद्योजक एम. ए. युसूफ अली आणि त्यांची पत्नी सुदैवाने बचावले. वैमानिकालाही कोणतीही इजा झालेली नाही. अबुधाबीत मुख्यालय असलेल्या लुलू उद्योग समूहाचे प्रमुख युसूफ अली आपली पत्नी शबीरा आणि खासगी सचिव शाहीद पी. के. यांच्यासह भाडय़ाच्या हेलिकॉप्टरने प्रवास करीत होते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर वादळी पावसाला सुरुवात झाली. वातावरण खराब झाल्याने वैमानिकाला हेलिकॉप्टर केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अॅण्ड ओशन स्टडीजशेजारील दलदलीत आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले. सुदैवाने हेलिकॉप्टरमधील पुणालाही या क्रॅश लँडिंगप्रसंगी इजा झाली नाही. या प्रकारची चौकशी आता होणार आहे.