बऱ्याचदा चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरस्कार किंवा बोनस देऊन कंपनीकडून सन्मान केला जातो. मात्र मुंबईतील एका कंपनीने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवत त्यांना आगळ्यावेगळ्या प्रकारे प्रोत्साहन दिले आहे. हेलिकॉप्टर सफरीमुळे या कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. एम. आय. लाइफस्टाइल ग्लोब कंपनीमधील कमलेश पांचाळ, राजू कराडकर, ज्योती पांचाळ यांच्या प्रयत्नांतून कंपनीतील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टर सफारी घडवून आणली. या सुखद सफारीचा सुमारे 57 कर्मचाऱ्यांनी आनंद घेतला आहे.





























































