सामना इफेक्ट – बोट कुटूंबियांचे वृत्त प्रसिद्ध होताच मदतीसाठी हात सरसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जन्माला आलेली तीन अंध मुलं आणि त्यांच्या मातापित्यांच्या जीवनातील अंधकारमय जीवनाची कहाणी दैनिक सामनातून मांडण्यात आली. ज्या वयात मुलांनी आधार द्यायचा, त्या वयात ते मातापिताच त्या तीन अंध मुलांची काठी बनले आहेत. आपल्यानंतर त्या तीन मुलांचे काय होणार या विवंचनेत हे दोघे मातापिता असताना दैनिक सामनाच्या बातमीनंतर दानशूर मंडळींनी मदतीकरीता हात पुढे केला आहे. बातमी वाचल्यानंतर दुबईमध्ये असणाऱ्या बशीर हजवानी यांनी त्या तीन मुलांना पेन्शन स्वरुपात दरमहा मदत करण्याचे जाहीर केले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आंबेड येथील सलाउददीन बोट आणि त्यांची पत्नी अशमत यांची तीनही मुले जन्मतःच दृष्टहीन होती. हा मोठा आघात सहन करत त्या मातापित्यांनी त्या तीनही मुलांचा सांभाळ केला. सलाउददीन बोट हे सुरुवातीला वाहनचालकाचे काम करत. पण सध्या वयोमानानुसार त्यांना गाडी चालवता येत नाही. दुधाच्या व्यवसायावर त्यांची रोजीरोटी सुरु आहे. मोठ्या मुलाला शासनाकडून घरघंटी तर दुसऱ्या मुलाला झेरॉक्स मशीन मिळाले आहे. मात्र तिसरा मुलगा अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहे. बोट कुटूंबियांची ही वेदनादायी कहाणी दैनिक सामनात प्रसिद्ध झाली. ही बातमी वाचून दुबई येथील बशीर हजवानी यांनी रत्नागिरीतील रमजान गोलंदाज, फैयाज मुकादम आणि खलिद चौगुले यांना फोन करून माहिती घेतली आणि त्यांना दरमहा पेन्शनच्या स्वरुपात मदत करण्याचे जाहीर केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडूनही दखल
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकूल माधव फाऊंडेशन नेहमीच समाजातील वंचित दिव्यांग घटकांना मदत करते. दैनिक सामनातील बोट कुटूंबियांची कहाणी वाचल्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीजनेही त्याची दखल घेतली आहे. लवकरच ते बोट कुटूंबियांशी संपर्क साधून ते त्यांना काय मदत हवी आहे याची माहिती घेणार आहेत.

15 हजार रूपये जमा झाले
दुबईत वास्तव्याला असणाऱ्या बशीर हजवानी यांनी अश्मत बोट यांच्या बॅंक खात्यात 15 हजार रूपये बुधवारी जमा केले आहेत.दर महिन्याला ते 15 हजार रूपये देणार आहेत.तसेच मुंबईतील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करून त्या दृष्टीहीन भावंडावर उपचार करून दृष्टी परत येऊ शकते का? याबाबत प्रयत्न करणार आहेत.