बेईमानाविरुद्धच्या लढाईत निष्ठावंताला साथ द्या- हेमंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, हिंगोली

बेईमानाविरुद्धच्या या लढाईत भिंती रंगवत, पोस्टर चिटकवत काम करणाऱ्या माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला साथ द्या, तुमच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे वचन देतो, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे हिंगोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांनी पानकनेरगावसह विविध गावात बोलतांना केले.

महायुतीचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांनी सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव, जवळा, पळशी, आजेगाव यासह विविध गावात ७ एप्रिल रोजी सायंकाळी गाठीभेटी दिल्या. पानकनेरगाव येथे भव्य जाहीर सभा झाली. या सभेला माजी खासदार शिवाजीराव माने, आमदार तानाजी मुटकुळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, परमेश्वर मांडगे, तालुकाप्रमुख संतोष देवकर, जि.प. सभापती प्रतिनिधी भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे, दिनकरराव देशमुख यांच्यासह शिवसेना-भाजपचे व महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेला पानकनेरगाव व परिसरातील विविध गावातील 5 हजाराच्यावर नागरिकांनी उपस्थिती लावून शिवसेना व महायुतीवरील विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी बोलतांना महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील म्हणाले की, ”15 वर्षं आमदार आणि 5 वर्षं खासदार अशी 20 वर्ष शिवसेनेच्या जिवावर सत्ता उपभोगून सुभाष वानखेडे यांनी दल बदलुपणा केला आहे. शिवसैनिकांच्या ताकदीवर सत्तेच्या माध्यमातून इमले बांधणाऱ्या वानखेडेंनी सामान्य शिवसैनिकाला काहीच दिले नाही. परभणी असो की हिंगोली शिवसेनेसोबत ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्या कपाळाला कधी गुलाल लागला नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे बेईमानाविरुद्धच्या या लढाईत भिंती रंगवत, पोस्टर चिटकवत काम करणाऱ्या माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला साथ द्या”, असं आवाहन हेमंत पाटील यांनी केलं.

”मी बाहेरचा उमेदवार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, काँग्रेस आणि वंचित आघाडीचा उमेदवार देखील नांदेड जिल्ह्यातील आहे. हिंगोली जिल्हा ही माझी जन्मभूमी असून या जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा अभ्यास मी केला आहे. सिंचनासोबतच उद्योग वाढीसाठी प्रयत्न राहणार आहेत. ही निवडणुक कोण, कुठला उमेदवार यांची नाही तर देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात या देशाचे भविष्य सुरक्षित राहणार आहे. माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी काँग्रेसकडे मुद्देच नाहीत, असा पलटवार करत हेमंत पाटील यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांनी या निवडणुकीतून पळ काढल्याचा टोला लगावला. छत्रपती शिवरायांचा भगवा ज्यांनी खाली ठेवला, शिवसेनाप्रमुखांच्या विचारासोबत ज्यांनी प्रतारणा केली, त्यांना शिवसैनिक व जनता धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.