
जोगेश्वरी पूर्वच्या विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारा अपक्ष उमेदवार रोहन साटोणेला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. दंडाची अनामत रक्कम म्हणून साडेतीन लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने साटोणेला दिले आहेत.
साटोणेच्या निवडणूक याचिकेवर न्या. अभय अहुजा यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली. येथील शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनंत नर यांच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर साटोणेने ही याचिका मागे घेण्याची परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. यासाठी रीतसर अर्ज करून त्याची प्रत सर्व प्रतिवादींना द्यावी व दंडाची रक्कम दोन आठवड्यांत न्यायालयात जमा करा, असे आदेश न्यायालयाने साटोणेला दिले. यावरील पुढील सुनावणी 15 जुलै 2025 रोजी होणार आहे.
नर यांचा दावा
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ही याचिका दाखल झालेली नाही. या निवडणुकीच्या निकालावर किंवा उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला नाही. या याचिकेवर निर्णय होईपर्यंत न्यायालय याचिकाकर्त्याला दंडाची रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश देऊ शकते, असा दावा नर यांच्याकडून करण्यात आला.