हिंदमाता प्रकल्पाचे काम आजपासून सुरू करा! हायकोर्टाचे पालिकेला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदमाता परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी भूमिगत तीन टाक्या बांधण्यात येणार आहेत. टाटा मिल्सच्या जमिनीखालून या टाक्यांपर्यंत पाईपलाईन टाकण्यात येणार असून या प्रकल्पाच्या कामाला परवानगी देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. हायकोर्टाने याची दखल घेत या प्रकल्पाचे काम उद्या शनिवार, 29 मेपासून सुरू करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

हिंदमातामधील पाण्याचा निचरा करण्यासाठी तीन टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 650 मीटर लांब व 1200 मीटर व्यासाची पाईपलाईन टाटा मिल्सच्या जमिनीखालून टाकण्यात येणार आहे. मात्र टाटा मिल्स पेंद्राच्या एनटीसीएलच्या ताब्यात असल्याने पालिकेला परवानगी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे याप्रकरणी पालिका प्रशासनाने टाटा मिल्सला नोटीस बजावली.

या नोटिसीविरोधात टाटा मिल्सने अॅड. भूषण जोशी यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी टाटा मिल्सतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी बाजू मांडली. त्यांनी कोर्टाला सांगितले की, पालिका प्रशासनाकडून अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यावर पालिकेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील एन. व्ही. वालावलकर यांनी खंडपीठाला सांगितले की, पालिका आयुक्तांनी पैसे मंजूर केले असून लवकरच टाटा मिल्सला दिले जातील. तसेच पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. पेंद्राच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले की, पेंद्राने आठवडाभराच्या आत हा प्रस्ताव मंजूर केला आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत पालिका प्रशासनाला उद्यापासून काम सुरू करायला परवानगी दिली.