
सामना प्रतिनिधी, मुंबई
आचारसंहिता लागू झाली की पालिकेला वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करता येणार नाही. या समितीअभावी मेट्रोसह मुंबतील विविध विकासकामे खोळंबतील. त्यामुळे दिवसरात्र काम करा, पण वृक्ष प्राधिकरण समिती लवकरात लवकर स्थापन करा, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले.
आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्यात येणार आहेत, परंतु वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांचा अभाव असल्याने पालिकेने या वृक्षतोडीला परवानगी दिलेली नाही. वृक्ष प्राधिकरण समितीअभावी ही विकासकामे लटकणार असल्याने राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज करण्यात आला आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने पालिकेला न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करून ती कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.


























































