ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कायदे हवेत, कोल्ड प्लेसंदर्भातील याचिका हायकोर्टाकडून निकाली

ऑनलाइन तिकीट विक्रीद्वारे लोकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे. तिकीट विक्रीतील या गैरव्यवहाराबाबत चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या अपयशावर बोट ठेवले. ऑनलाइन तिकीट विक्रीतील फसवणूक, गैरव्यवहार राज्य सरकारच रोखू शकते. त्यासाठी कठोर कायदे असायला हवेत असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

नवी मुंबईत 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी ब्रिटिश बँड कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट होणार आहे. कॉन्सर्टची तिकिटे यापूर्वीच बुकिंग झाल्या आहेत. असे असताना तिकीट विक्रीत अनियमितता असल्याचे समोर आले. तिकीट विक्रीचा घोळ थांबवण्यात यावा अशी मागणी करत अॅड. अमित व्यास यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र पुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही याचिका गेल्या आठवडय़ात फेटाळून लावली. त्याबाबतचे निकालपत्र आज गुरुवारी जाहीर झाले.