
सामना प्रतिनिधी, मुंबई
ध्वनिप्रदूषणाची राज्यभरातील पातळी मोजण्यासाठी कोर्टाकडे वर्षभराचा अवधी मागणाऱया राज्य सरकारचे मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच कान टोचले. नॉइस मॅपिंगकरिता वर्षभराचा कालावधी कशासाठी हवा, असे खडसावत याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने राज्य सरकार तसेच ‘निरी’ संस्थेला दिले.
ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असल्याप्रकरणी आवाज फाऊंडेशनतर्फे जनहित याचिका दाखल केली आहे. एमपीसीबी तसेच पोलिसांनी आतापर्यंत ध्वनिप्रदूषणासंदर्भात 377 तक्रारी नोंदवल्या असून त्यापैकी 43 तक्रारींची दखल घेण्यात आली असल्याचे कोर्टाला सांगितले, तर उर्वरित तक्रारींसंदर्भात लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली. गेल्या वर्षभरात ध्वनिप्रदूषणावरील कारवाईचा तपशील सादर करण्यासाठी पोलिसांनी दोन महिन्यांची मुदतही मागितली. परंतु या उर्वरित तक्रारींची दखल घेण्यास उशीर का, असा सवाल करत न्यायमूर्तींनी मुदत देण्यास नकार देऊन अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. सरकारच्या वतीने ऍड. यतीन कोचरे यांनी बाजू मांडली.
उल्हासनगर, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि मालेगाव या महापालिकांनी अनधिकृत मंडपप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. हायकोर्टाने याची दखल घेत बेकायदा मंडपप्रकरणी ही शेवटची संधी देत असून 31 मेपर्यंत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तसेच सण-उत्सवांसह सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना राज्यभरात समान नियमावली हवी. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करा असेही न्यायमूर्तींनी सरकारला यावेळी बजावले.



























































