उत्तर प्रदेशात पूर्ण लॉकडाऊन  लागू करण्याचा विचार करा; योगी सरकारला अलाहाबाद हायकोर्टाने फटकारले

उत्तर प्रदेशातील कोरोना संसर्गाच्या उद्रेकावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी योगी सरकारला कडक शब्दांत फटकारले. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटचे प्रमाण वाढवा. कोरोनाचा संसर्ग सुरू होऊन वर्ष उलटलेय, तरी तुम्ही अजून आरोग्य सुविधा का वाढवू शकला नाहीत? या घडीला विकासाच्या गप्पागोष्टी करू नका. जर लोकच राहणार नसतील तर विकासाला काय अर्थ आहे, अशा शब्दांत कान उपटत न्यायालयाने कोरोनाचे अधिक रुग्ण असलेल्या परिसरात दोन-तीन आठवडय़ांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्याबाबत विचार करण्याचे निर्देशही दिले.

उत्तर प्रदेशातील कोरोनाचा फैलाव थोपवण्यात योगी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या भीषण परिस्थितीवरून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालयांत जागा नसेल तर मोकळ्या मैदानांत तात्पुरती रुग्णालये उभारा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांत 50 पेक्षा अधिक लोक जमणार नाहीत, याची खबरदारी घ्या, दिवसा गाडय़ांची होणारी अनावश्यक गर्दी रोखा, असे विविध निर्देश देत न्यायालयाने सचिव पातळीवरील अधिकाऱयांकडून 19 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र मागितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या