
महाबळेश्वर तालुक्यात आणि जावळी, बामनोली, तापोळा, पाचगणी या डोंगररांगांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. उत्तर हिंदुस्थानातून दक्षिण दिशेने सरकलेल्या तीव्र शीतलहरींचा परिणाम म्हणून महाराष्ट्राचे मिनी कश्मीर समजल्या जाणाऱया महाबळेश्वरच्या तापमानाचा पारा दरदिवशी झपाटय़ाने खाली येत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात तापमान 9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. डोंगरमाथ्यांवर सकाळी दाट धुक्याची चादर पसरते आहे. दुपारपर्यंत गारठा कणभरही कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, हे वातावरण स्ट्रॉबेरी हंगामाला पोषक ठरणारे आहे.
गारठय़ामुळे धुक्याचे प्रमाण वाढले आहे. फोटोग्राफी करू इच्छिणाऱयांसाठी हे वातावरण आनंददायी ठरत आहे. त्यामुळे पर्यटकांची रहदारी वाढल्याचे स्थानिक व्यापाऱयांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स, कॅफे आणि होम-स्टेजमध्ये रात्री शेकोटय़ांची सोय केली जात असून, गरम पेयांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे.
स्ट्रॉबेरी हंगामाला पोषक वातावरण
या तीव्र थंडीचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे महाबळेश्वर–पाचगणी स्ट्रॉबेरी हंगामाला मिळणारे अनुकूल हवामान. स्ट्रॉबेरीचे फळ अधिक ताजे, लालसर आणि गोड होण्यासाठी 8 ते 12 अंश तापमान सर्वांत आदर्श मानले जाते. त्यामुळे शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या हंगामात उत्पादन आणि गुणवत्ता उत्कृष्ट राहील, असा अंदाज कृषितज्ञांनी व्यक्त केला आहे.
पुढील काही दिवस थंडी कायम
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता असून, महाबळेश्वर, जावळी, पाचगणी भागांत शीतलहरींचा प्रकोप कायम राहणार आहे. रात्रीचे तापमान पुन्हा एकदा 9 ते 10 अंशांपर्यंत खाली येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
थंडीमुळे पर्यटनस्थळांवर गर्दी
महाबळेश्वर, पाचगणीमधील टेबल लॅण्ड, वेण्णा लेक, आर्थर सीट, केट्स पॉइंट, विल्सन पॉइंट या ठिकाणी प्रचंड गारठय़ामुळे पर्यटक उबदार कपडय़ांचे थर घालून फिरताना दिसत आहेत. हात–पाय गोठवणारी हवा, पानांवर जमा होणारे बारीक दवबिंदू असा मंत्रमुग्ध करणारा माहोल सध्या आहे. दिवसभरात अनेकदा तापमान 14 अंशांच्या आसपास, तर रात्री पुन्हा 9 अंशांवर स्थिरावते आहे.
जावळी, बामनोली, तापोळा घाटमाथ्यांवर दाट धुके
जावळी आणि बामनोलीच्या पठारी भागात सकाळी 6 ते 10 वाजेदरम्यान घनदाट धुके निर्माण होत असून, दृश्यता कमी झाल्याने वाहनधारकांना खबरदारीने प्रवास करावा लागत आहे. तापोळा, तळेगाव, मेट, बामनोली मार्गांवर थंड वाऱयांचे झोत इतके तीव्र आहेत की, स्थानिक नागरिकही दुपारी बाहेर पडताना जाड स्वेटर आणि मफलरचा वापर करत आहेत.

























































