समुद्र खवळला, चौपाटय़ांवर कचऱ्याचा खच!

सामना ऑनलाईन । मुंबई

या वर्षीच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती असल्यामुळे आज दुपारी समुद्र चांगलाच खवळला. उधाणामुळे चौपाटीवर तब्बल ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या, मात्र खवळलेल्या समुद्राने तब्बल २१९ मेट्रिक टन कचरा बाहेर फेकला. वांद्रय़ाच्या कोळीवाडय़ात आज पुन्हा पाणी घुसले.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहिला. सकाळपासूनच मुंबई शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी चौपाटय़ांवर गर्दी केली. तब्बल १६ फुटांच्या लाटा उसळल्या. या लाटांबरोबर समुद्राने मोठय़ा प्रमाणात कचराही बाहेर फेकला. दरम्यान, आज मोठय़ा संख्येने पर्यटक चौपाटय़ांवर आल्यामुळे पालिकेने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नाही.

पडझड सुरूच
मुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे मुंबईत तीन ठिकाणी घर कोसळल्याच्या घटना घडल्या तर आठ ठिकाणी शॉर्टसर्किट आणि १३ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मात्र या दुर्घटनांमध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

दोन दिवस सावधान!
अजून दोन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यातच १६ जुलै रोजी दुपारी २.३७ वाजता ४.८९ मीटर तर १७ जुलै रोजी दुपारी ३.१५ वाजता ४.७० मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. जोरदार पाऊस आणि मोठय़ा भरतीमुळे मुंबईकरांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.

प्लॅस्टिकचा कचरा जास्त
रविवारी एका दिवसात दादर-माहीम किनाऱ्यावर ९० मेट्रिक टन कचरा जमा झाला. ४० कामगारांनी हा कचरा साफ केला तर मरीन लाइन्स किनाऱ्यावर ९ मेट्रिक टन, गोराई – १५ मेट्रिक टन, जुहू – ७५ मेट्रिक टन, वर्सोवा – १५ टन तर गिरगाव किनाऱ्यावर ८ मेट्रिक टन कचरा जमा झाला. या कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले.