
कर्नाटकात हिजाबवरून गदारोळ सुरू असताना आज न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. याप्रकरणी बोलताना कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल येईपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पेहरावावर बंदी घातली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, निकाल येईपर्यंत शाळा -महाविद्यालय सुरू केले जाऊ शकतात. याप्रकरणी आता पुढील सुनावणी सोमवारी दुपारी 2.30 वाजता होणार आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयाचा आदेश न पाहता चर्चेदरम्यान न्यायालयाने केलेल्या कोणत्याही टिप्पणीचे वार्तांकन करू नये, असे आवाहन माध्यमांना केले. आदेश पूर्ण होईपर्यंत सोशल मीडिया, वृत्तपत्र किंवा कोठेही बातम्या देऊ नका, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
कर्नाटकातील उडुपी जिह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. हिजाब विरुद्ध भगवी शाल, उपरणे असा वाद आहे. कर्नाटकातील इतर शहरांमध्ये हा वाद पसरला आहे. त्यातच शिमोगा, बालकोटसह काही ठिकाणी दगडफेक झाल्याने कर्नाटक सरकारने तीन दिवस राज्यभर शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले.