
हिंदमाता उड्डाणपूल व परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवल्यामुळे भरपावसातही या भागातील वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे. पालिकेने अवघ्या अडीच महिन्यांत हे काम पूर्ण केले आहे. या कामाचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.
पालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता उड्डाणपूल व परळ टीटी परिसरात अतिवृष्टीत पाणी साचल्याचे प्रकार घडत असल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे हिंदमाता या ठिकाणी भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. आता या ठिकाणच्या रस्त्याची उंचीही वाढवण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर होणार आहे. या कामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता उड्डाणपूल व परेल उड्डाणपूल यादरम्यानच्या रस्त्याची उंची 1.2 मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सदर काम एप्रिल महिन्यामध्ये सुरू करून अडीच महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. या कामामुळे अतिवृष्टीतही हिंदमाता परिसरातील रस्ते वाहतूक उन्नत केलेल्या मार्गिकेमुळे पूर्णपणे सुरळीत सुरू राहील. उंची वाढवलेल्या रस्त्यांच्या लोकार्पणप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, नगरसेविका श्रद्धा कांबळे, उर्मिला पांचाळ, नगरसेवक अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपआयुक्त विजय बालमवार, तळकर आदी उपस्थित होते.
सुरक्षित प्रवास, आवाज प्रतिबंध, पाण्याचा जलद निचरा
या रस्त्याची लांबी 180 मीटर, रुंदी 17 मीटर (सरासरी), दोन्ही पुलांमधील वाढवलेल्या रस्त्याची उंची 1.2 मीटर आहे. रस्त्याचे आयुष्य वाढविण्यासाठी हा संपूर्ण रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आला आहे. ‘एचआयएलटीआय’ या तंत्रज्ञानाचा वापर करून या रस्त्याची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.
रस्त्यावरील पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने 300 मीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी बसविण्यात आली आहे. या रस्त्यावर भविष्यात होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक अडथळे बसविण्यात आले आहेत. तसेच वाहने घसरून अपघात होऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच आवाज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली आहे.



























































