देशात राहणारी 130 कोटी जनता ही हिंदूच- मोहन भागवत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात हिंदुत्वाच्या मुद्दावरून सध्या राजकारण तापलेलं आहे. अशा परिस्थितीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. या देशात राहणारे सर्व 130 कोटी लोक हे हिंदूच आहे. ‘हिंदू’ याचा अर्थ अतिशय व्यापक आहे, तो संकुचित नाही असं म्हणतानाच भागवत म्हणाले की ‘जी व्यक्ती कुठल्याही पूजा पद्धतीचा अंगिकार करते, पण ती देशाला मातृभूमी मानते ती हिंदूच आहे असे आम्ही मानतो.’ हैदराबाद इथं संघाचं तीन दिवसांचं शिबीर पार पडलं. विजय संकल्प शिबीर असं नाव या शिबीराला देण्यात आलं होतं. आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील स्वयंसेवक या शिबिराला हजर होते. शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी हिंदुत्व आणि संघाची भूमिका याबाबत विस्ताराने त्यांचे मत व्यक्त केले.

या शिबिरात बोलत असताना भागवत म्हणाले की संघ सगळ्यांना स्वीकार करतो आणि त्यांच्याबद्दल चांगला विचार करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी त्यांचा स्तर उंचावला जावा यासाठी संघ प्रयत्न करत असतो. भागवत यांनी रविंद्रनाथ टागोर यांची काही वाक्य यावेळी सांगत त्यांची भूमिका आणखी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. टागोर असं म्हणाले होते की ‘इंग्रजांना असे वाटते की ज्यांना हिंदू म्हणवले जाते आणि दुसऱ्या समूहाला मुसलमान म्हटले जाते ते आपापसात संघर्ष करतील आणि नष्ट होतील. मात्र इंग्रजांनो याद राखा असं होणार नाही. अशा संघर्षातूनच समाज त्यांचा मार्ग निवडेल ‘ सरसंघचालक त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की आपण म्हणतो की विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. मात्र एकतेमध्येच विविधता आहे. आपण विविधतेमध्ये एकता शोधत नसून विविधता ज्या एकतेतून निर्माण झाली आहे, ती एकता शोधत आहोत.