
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
देशातील बहुसंख्य हिंदूंनी ज्या उद्देशाने केंद्रात भाजप सरकार निवडून दिले त्यातील एकही उद्देश मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. आता अयोध्येत राम मंदिर उभारणीचे वचन पूर्ण झाले नाही तर समस्त हिंदू केंद्रातील सरकारच बदलतील, असा संतप्त इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सत्ताधारी भाजपला दिला आहे. राम मंदिरासाठी आपली संघटना 21 ऑक्टोबरला लखनौ ते अयोध्या रॅली काढणार असल्याची घोषणा तोगडिया यांनी बिजनोर येथे बोलताना केली. 21 ऑक्टोबरच्या रॅलीनंतरही एनडीए सरकार ढिम्म राहिले तर आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून खाली खेचू आणि हिंदुहित जपणारे सरकार केंद्रात सत्तेवर आणू, असे तोगडिया पुढे म्हणाले.

























































