
देशातील प्रत्येक नागरिकाला हिंदू कसे म्हणता येईल, असा सवाल रिपाईं नेते रामदास आठवले यांनी गुरुवारी केला. ते पुढे म्हणाले की, एक काळ होता जेव्हा देशातील प्रत्येकजण बौद्ध होता. त्यानंतर हिंदू धर्म आला आणि आपला देश हिंदूराष्ट्र बनला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी हैदराबादच्या विजय संकल्प सभेत सीएए, एनआरसी आणि एनपीआर मुद्यावर बोलताना म्हटले होते की, आरएसएसच्या नजरेत देशातील 130 कोटी लोक हे हिंदूच आहेत. देशातील लोकांची संस्कृती आणि धर्म वेगवेगळे असले तरी सर्वजण हिंदूच आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, देशातील सर्वांना हिंदू म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही. भागवत यांना देशातील प्रत्येकजण आपला आहे असे म्हणायचे असेल तर ठीक आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालकांच्या वक्तव्यावर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आरएसएसला असेच वाटते की संपूर्ण देशात एकच धर्म व्हावा. मात्र हा देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार सर्वांचा आहे.
























































