
हिंगणघाट येथील प्राध्यापिकेच्या जळीत हत्याकांडातील आरोपी विकेश नगराळे याला अटक केल्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बुधवारी विकेश याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ब्लॅकेटच्या चिंधीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली; परंतु कारागृह प्रशासनाने अद्याप या घटनेला दुजोरा दिलेला नाही. 3 फेबुवारी रोजी हिंगणघाट येथील नंदोरी चौकात एका प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेबुवारी रोजी पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. जनतेचा आक्रोश बघता त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता पोलीस विभागाने त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. विक्कीने कारागृहात असताना आता मला गोळय़ा घाला, असे म्हणत आकांडतांडव केले होते.

































































