रस्त्याच्या चौकशीसाठी भजन आंदोलन करण्याचा ईशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी जिल्हा परिषद सर्कलमधील प्रमुख मार्ग क्र. ८ पार्डी मोड ते कोंढुर या ९ कि.मी.चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतो. मात्र, कंत्राटदारांनी थातुर-मातुर रस्त्याची दुरुस्ती केली. याची चौकशी करावी व नवीन रस्ता करावा, या मागणीसाठी २३ ऑक्टोबर रोजी एक दिवशीय भजन आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पार्डी मोड ते कोंढुर या ८ कि.मी. रस्ता हा सा.बां.च्या अंतर्गत येतो. सदर रस्त्याच्या दुरुस्तीकरिता सन २०१७-१८, २०१८-१९ दोन वर्षाच्या कामाचे टेंडर संबंधीत ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, ठेकेदारांनी सन २०१७-१८ या वर्षात अर्धवट रस्ता केला आहे. मात्र, पावसामुळे यात आणखी भर पडली. रस्त्याची अत्यंत दुरावस्था होऊन खड्डे पडले आहेत. या मार्गावर कोंढुर, बिबथर, डिग्रस, पानवाडी, चिंचोर्डी, वंजारवाडी, पार्डी आदी गावांचे विद्यार्थी व विद्यार्थीनी शाळा महाविद्यालयात बसमधून ये-जा करतात. या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे बससेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. पण या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरुन जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामोर २३ ऑक्टोबर रोजी ११ ते ५ या दरम्यान भजन आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे जि.प. सदस्य बाळासाहेब उत्तमराव मगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे दिला आहे.