विधानसभा२०१९ – हिंगोलीत ‘दुरंगी’, कळमनुरीत ‘तिरंगी’ तर वसमतला ‘चौरंगी’ लढत

6479

हिंगोली जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी हिंगोलीत दुरंगी, कळमनुरीत तिरंगी तर वसमतला चौरंगी लढत रंगणार आहे. एकूण 33 उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीसाठी 9 लाख 9 हजार 204 मतदार मतदानासाठी पात्र असून 1 हजार 1 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांचा बोलबाला या निवडणुकीत राहुन तिन्ही ठिकाणी महायुतीचा भगवा फडकेल, असे चित्र दिसून येत आहे.

हिंगोली विधानसभा क्षेत्रात 14 उमेदवार नशीब आजमावत असून आमदार व महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे व काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे तिसऱ्यांदा एकमेंकांच्या समोर उभे टाकले आहेत. यापैकी प्रत्येकी एका वेळी गोरेगावकर व मुटकुळेंनी विजय मिळविला असून आता तिसऱ्यांदा दोघातच प्रमुख लढत राहणार आहे. शिवसेना-भाजपा महायुती सरकारच्या पाच वर्षातील कामगिरी सोबतच मतदारसंघातील विकास कामाच्या बळावर मुटकुळे हे मतदारांना सामोरे जात आहेत.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

कळमनुरीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व महायुतीचे उमेदवार संतोष बांगर, काँग्रेसचे विद्यमान आमदार संतोष टारपेâ, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व अपक्ष जिल्हा परिषद सदस्य अजीत मगर यांच्यात तिरंगी सामना होणार असून सात उमेदवार निवडणुक लढवत आहेत. शेतकऱ्यांसाठी व विविध गावात विद्युत रोहित्राचा प्रश्न सोडविण्यासाठी मागिल तीन वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी घेतलेला पुढाकार, युवकांसोबतच जेष्ठ मंडळींशी साधलेला संपर्क, महायुतीचे भक्कम नेटवर्क, जनतेच्या विविध प्रशासकीय कार्यालयातील अडचणी सोडविण्यासाठी केलेली मदत या संतोष बांगर यांच्या जमेच्या बाजु आहेत.

तत्कालीन खासदार राजीव सातव यांच्यामुळे काँग्रेस आमदार डॉ. संतोष टारफे यांना स्वत:ची वेगळी छाप पाडता आली नाही. सातव सांगतील तेवढेच ऐकणारे म्हणून आमदार टारफे यांच्या विषयी जनसामान्यात चर्चा आहे. पाच वर्षाच्या काळात आमदार टारफे यांना कळमनुरी मतदारसंघात भरीव विकास कामे करता आली नाहीत. त्यामुळे मतदारात त्यांच्या विषयी नाराजी आहे. जिल्हा परिषद सदस्य अजीत मगर हे देखील वंचितकडुन नशीब आजमावत आहेत.

वसमत मतदारसंघामध्ये शिवसेनेचे माजी सहकारमंत्री व विद्यमान आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा हे सातव्यांदा महायुतीकडुन रिंगणात उतरले असून त्यांच्यासह बारा उमेदवार नशीब आजमावत आहेत. वसमतला डॉ. मुंदडा, राष्ट्रवादीचे राजु नवघरे, वंचितचे मुनीर पटेल व अपक्ष अ‍ॅड. शिवाजी जाधव अशी चौरंगी लढत होणार आहे. वसमतच्या सर्वांगीण विकासासाठी मागिल 25 वर्षात डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी केलेल्या कामामुळे मतदारसंघात नागरिकांचा मोठा पाठींबा त्यांना मिळत आहे. भाजपचे अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी केली असली तरीही बहुतांश भाजप कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करत आहेत. सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे खासदार हेमंत पाटील यांना हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीनही मतदारसंघात 40 हजाराच्यावर मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या