हिंगोली दंगलप्रकरणी 14 जणांना अटक: दिडशे जणांवर गुन्ह्याची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आयोजीत केलेल्या हिंगोली शहरातील कावडयात्रेवर व सहभागी शिवसैनिक, शिवभक्तांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड व नासधुस केल्याप्रकरणी ८ मुस्लीमांच्या नावासह शंभर ते दिडशे जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ जणांना शहर पोलिसांनी अटक केली असून पोलिसांकडून दंगेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल हे हिंगोलीत तळ ठोकून बसले असून आज मंगळवारी शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असली तरीही बाजारपेठ सुरळीत सुरु होती. दरम्यान, तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत तर एका पोलीस उपनिरीक्षकाला  नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे.

हिंगोली शहरात १२ ऑगस्ट रोजी बकरी ईदच्या नमाजानंतर हुल्लडबाजी करुन कुरापत काढत धर्मांध मुस्लीमांनी दंगल घडविली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सरकार पक्षाच्या वतीने स्वत: फिर्याद देऊन गुन्ह्याची नोंद केली. रात्री साडे दहा वाजता पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. आठ जणांच्या नावासोबतच ईतर शंभर ते दिडशे आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पीएसआय प्रकाश कांबळे हे करत आहेत. रात्रीपासूनच पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरु केली. १४ जणांना अटक करण्यात आल्याचे शहर पोलीस ठाण्यातुन सांगण्यात आले. मात्र, आरोपींची नावे देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय दिनेश काशिद यांना पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी संलग्न करण्यात आले असून पोलीस कर्मचारी गणेश वाबळे, विलास शिनगारे, नितीन रामदिनवार या तिघांना आयजीपी प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार निलंबीत करण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले, याबाबतची माहिती देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.

हिंगोली शहरात आज दिवसभर तणावाचे वातावरण होते. मात्र, सकाळी दहा वाजल्यापासून बाजारपेठेतील विविध दुकाने उघडायला सुरुवात झाली. तसेच रहदारीही वाढली. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी शांतता समितीची बैठक घेतली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शहरासह जिल्हावासीयांना कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी शांतता राखावी व अफवा पसरवू नयेत, असे आवाहन केले.