
सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरीना येथे इतिहास रचला जाणार आहे. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार सुनील छेत्री या मैदानात आपल्या कारकीर्दीतील शंभरावा सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो हिंदुस्थानातील दुसरा फुटबॉलपटू ठरणार आहे. याआधी बायचुंग भुतियाने देशासाठी सर्वाधिक १०४ सामने खेळण्याचा मान संपादन केलाय. सलामीच्या लढतीत चीन तैपेईला पराभूत करणाऱया हिंदुस्थानला उद्याच्या लढतीत केनियाचा सामना करावयाचा आहे, पण तमाम फुटबॉलप्रेमींच्या नजरा मात्र यावेळी सुनील छेत्रीवर असणार आहेत.
फुटबॉलप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे – सुनील
आपला शंभरावा सामना संस्मरणीय व्हावा तसेच फुटबॉल या खेळाकडे क्रीडाप्रेमींची पावले वळावी यासाठी सुनील छेत्री याने सोशल नेटवर्किंग साइटवर भावनिक आवाहन केले आहे. यावेळी तो म्हणाला, फुटबॉल हा जगातील नंबर वन खेळ असून आम्ही देशासाठी मैदानात घाम गाळतोय. त्यामुळे जे फुटबॉलप्रेमी नसतील त्यांनीही स्टेडियममध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये या. आमच्यावर टीका करा, पण खेळाशी जोडले रहा.
लढत स्पेशल
मुंबई फुटबॉल अरीनात सोमवारच्या लढतीआधी सुनील छेत्री याने कसून सराव केला. याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळीन असे वाटले नव्हते. पण प्रत्यक्षात १०० वा सामना उद्या खेळणार आहे. ही लढत माझ्यासाठी स्पेशल असून भावनिकही आहे. माझी आईही यावेळी भावनिक झालीय, असे सलामीच्या लढतीत दमदार हॅटट्रिक करणारा सुनील पुढे म्हणाला.




























































