इतिहासाचे आधारस्तंभ

496

>> संजय मिस्त्री

इतिहासाचे प्राध्यापक, डॉक्टर असलेल्या ‘रा. श्री.’ यांचा जागतिक पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील आणि विविध नामांकित संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकताच त्यांचा जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरव केला. इतिहास संस्कृती, जलसंवर्धन अशा अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले ‘रा.श्री.’ म्हणजे अभ्यासक आणि संशोधकांचाच नव्हे तर इतिहास संशोधनाचाही एक आधारस्तंभ आहेत.

घराण्यातच इतिहासाचा वारसा असल्याने मोरवंचीकरांचे संपूर्ण आयुष्य इतिहास आणि संस्कृतीमय झालेले आहे. निजाम सरकारने त्यांच्या आजोबांना सोलापूर व धाराशिव जिल्हय़ांतील तीन गावे काटी, मोरवंची, चिंचोली व सिदफळ गुजराणीसाठी दिलेली होती. घराण्यात जमीनजुमला भरपूर होता. मूळ आडनाव रत्नपारखी हे असले तरी मोरवंचीचे म्हणून मोरवंचीकर झाले व तेच नाव कायम झाले. पुढे घराण्याच्या इतिहासाचा वारसा घेऊन ते पैठणला आले आणि पैठणच्या संशोधनात एवढे रमले की, संपूर्ण जगभर त्यांची ओळख पैठणचे मोरवंचीकर अशीच आहे. नोकरीसाठी म्हणून पैठणला आले आणि ‘रा. श्री.’ पैठणचेच होऊन गेले. प्रतिष्ठान महाविद्यालयाचे इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या रा. श्री.कडून पैठणचा इतिहास जाणून घेण्याची लोकांना मोठी उत्कंठा असे. प्रसिद्ध इतिहासकार व गुरू दत्तो वामन पोतदार यांनी त्यांना शालिवाहनावर संशोधन करण्याचा आदेश दिला. त्यातूनच पैठणच्या इतिहासाचा अभ्यास सुरू झाला आणि सतत 11 वर्षे ते पैठणचे संशोधन, अभ्यास करीत राहिले. पैठणच्या उत्खननातही त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण सहभाग घेतला. पैठणविषयी त्यांनी एवढी महत्त्वपूर्ण माहिती संकलित केली की, त्यामुळे मोरवंचीकरांचे पैठण आणि पैठणचे मोरवंचीकर असे समीकरणच तयार झाले. पैठण आणि सातवाहन कालीन इतिहासाचा वेध घेताना ऐतिहासिक वस्तूंचे संग्राहक पैठणचे बाळासाहेब पाटील यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.  संशोधनाचा विषय आणि संशोधक यांच्यात राधा-कृष्ण, प्रियकर-प्रेयसी यांचे एक अध्यात्मिक नाते असते, असे मोरवंचीकर म्हणतात. शालिवाहन अर्थात सातवाहनाविषयीच्या आख्यायिका, लोककथा, लोकगीते, परंपरागत साहित्य, गाथा सत्तसई, कथा सरित्सागर अशा साधनांच्या अभ्यासातून, बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने परिसरातील मिळणाऱ्या पुरातत्त्वीय वस्तू आणि वास्तूंच्या अभ्यासातून गाथा, लोककथा आणि आख्यायिकांमागील लपलेला इतिहास त्यांना उलगडून दाखवता आला. दंतकथा किंवा आख्यायिका आणि वास्तव यातील नाते त्यांनी स्पष्ट करून दाखवले. संपूर्ण दक्षिण हिंदुस्तान व्यापणारे सातवाहन घराणे हे प्रतिष्ठान तथा पैठणचेच हे त्यांनी संशोधनातून सिद्ध केले. त्याआधी पैठण नेमके कुठले याविषयी संभ्रम, वाद होते. मोरवंचीकरांनी तो प्रश्नच शिल्लक ठेवला नाही.

प्रतिष्ठान महाविद्यालयातून मोरवंचीकर विद्यापीठात आले. इथे त्यांना नवीन विषय मिळाला. दौलताबाद! दौलताबाद किल्ल्यात पाणी येते कुठून या प्रश्नाने त्यांच्यातील संशोधक जागा झाला. यातूनच त्यांनी विद्यापीठातील नोकरीचा संपूर्ण काळ ऐतिहासिक जलसंस्कृतीचा वेध घेण्यात, संशोधन करण्यात आणि पाण्याच्या माध्यमातून इतिहास उलगडून दाखवण्यात घालवला. माथा ते पायथा ही जलसंवर्धनाची रचना आज जगमान्य झाली आहे. परंतु, शिवकाळ किंवा शिवपूर्व काळ म्हणजे यादवकाळापासून या तत्त्वाच्या आधारे जलसंवर्धन होत होते हे मोरवंचीकरांनी दाखवून दिले. पाण्याशिवाय संस्कृती नाही आणि पाण्याशिवाय इतिहास नाही हे त्यांनी जगभरातील संशोधकांना पटवून दिले. त्यांचे या विषयातील संशोधन एवढे जगद्मान्य झाले की, त्यांना सर्व सार्क राष्ट्रांची निमंत्रणे येऊ लागली. बांगलादेश, श्रीलंका आदी राष्ट्रांना त्यांनी त्या त्या राष्ट्राच्या जलसंस्कृतीचा परिचय करवून दिला. जलसंस्कृतीचा अभ्यास करताना मोरवंचीकरांना आढळून आले की, देशातील सर्व नद्या आता सुकत चालल्या आहेत,  पूर्वी बारमाही नद्या होत्या, आज त्या का राहिल्या नाहीत? या प्रश्नाने त्यांना व्यथित केले. त्यातून त्यांना खान्देशातील फड पद्धत पहायला मिळाली. पाणी प्रश्नाचे यात समाधान असल्याचे आणि जलसंस्कृती याच माध्यमातून विकृत होण्यापासून वाचवता येईल याची त्यांना खात्री झाली. या सर्व अभ्यासातून त्यांचे ‘शुष्क नद्यांचा आक्रोश’ हे पुस्तक आकारास आले. संभाजीनगर शहराला किमान सातशे वर्षांचा इतिहास आहे. शहरातील ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या इमारतींचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी तब्बल 155 इमारतींची यादी तयार केली. एवढेच नव्हे तर न्यायालयातही धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून मनपाला पुरातत्त्व समिती स्थापन करावी लागली. 45पेक्षा अधिक त्यांची ग्रंथसंपदा आहे. अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले ‘रा.श्री.’ म्हणजे अभ्यासक आणि संशोधकांचाच नव्हे तर इतिहास संशोधनाचाही एक आधारस्तंभ आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या