छत्तीसगडमधील १२५ नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे; हैदराबादमध्ये १३० जणांचे सामूहिक आत्मसमर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नक्षलवादाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, शनिवारी हैदराबादमध्ये एक ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत एकूण १३० नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे, शरण आलेल्या या १३० नक्षलवाद्यांपैकी १२५ जण हे एकट्या छत्तीसगडमधील असून, त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे.

या आत्मसमर्पणावेळी नक्षलवाद्यांनी १२४ आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा सुरक्षा दलांकडे सुपूर्द केला. यामध्ये ३१ एके-४७ रायफल्स, २१ इन्सास रायफल्स, १ इन्सास एलएमजी, २० एसएलआर आणि १८ .३०३ रायफल्सचा समावेश आहे. तेलंगणाचे पोलीस महासंचालक (DGP) बी. शिवधर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरण आलेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचे ३ सदस्य, १ प्रादेशिक समिती सदस्य आणि १० विभागीय समिती सदस्यांसारख्या मोठ्या लीडर्सचा समावेश आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे स्वागत केले. “लोकशाहीत बुलेटपेक्षा बॅलेट अधिक शक्तिशाली आहे,” असे म्हणत त्यांनी या निर्णयाचे कौतुक केले. तेलंगणा सरकारने या सर्वांसाठी विशेष पुनर्वसन पॅकेज जाहीर केले असून, त्यांना आर्थिक मदतीसोबतच आरोग्य कार्ड आणि मोफत उपचारांची सुविधा दिली जाणार आहे.