ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ शुटिंगसाठीच राहिला पाहिजे, मराठी चित्रपट महामंडळाचे साखळी उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jayprabha-studio

ऐतिहासिक व हेरिटेजमध्ये समावेश असलेला जयप्रभा स्टुडिओ हा शूटिंगसाठीच राहिला पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने स्टुडिओच्या दारातच साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. स्टुडिओत शूटिंगला सुरुवात होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा निर्धार यावेळी कलाकार, तत्रंज्ञ व नागरिकांनी केला.

चित्रपटनिर्मितीचे माहेरघर असलेल्या करवीरनगरीतील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ पहिल्या मूकपटापासून ते बोलपटांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत महत्त्वाचे स्थान असलेला हा स्टुडिओ विक्री प्रकरणावरून यापूर्वी कोल्हापूरकर विरुद्ध लता मंगेशकर असा संघर्ष निर्माण झाला होता. अनेक कलाकार आणि संघटना स्टुडिओसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. हा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही ऐतिहासिक वास्तूसह हा स्टुडिओ काही खासगी व्यावसायिकांनी दोन वर्षांपूर्वीच विकत घेतल्याचे काल समोर आले. त्यावरून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे.

हा ऐतिहासिक ठेवा परत मिळावा, यासाठी आज सकाळपासूनच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने जयप्रभा स्टुडिओसमोर बेमुदत साखळी पद्धतीचे उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, शरद चव्हाण, रणजित जाधव, सतीश बीडकर, रवि गावडे, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, अभिनेता स्वप्नील राजशेखर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, बाबा पार्टे, भूपाल शेटे, निर्माते विजय शिंदे, अर्जुन नलवडे, अमर मोरे, नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर आदी महामंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, कलाकार उपस्थित होते.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यातील काही खरेदीदारांच्या कार्यालयावर शाई फेकल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.