
आनंद, उत्साह वाढवणारा आणि नकारात्मकता दूर करणारा ‘होळी’ हा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड अर्थात धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना रंग लावण्यासाठी धुलिवंदनाच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात, मात्र रंग खेळण्याआधी आणि नंतर चेहऱ्याची, केसांची काळजी घेणे आवश्यक आहे, त्याप्रमाणेच डोळे आणि कानांचे रक्षण करणेही आवश्यक आहे, कारण हे दोन्हीही अत्यंत नाजूक अवयव आहेत. चुकून कानात किंवा डोळ्यात रंग जाऊ शकतो. रंग खेळण्यासाठी वापरण्यात येणारे रंग डोळ्यात किंवा कानात गेले तर जळजळ होणे, खाज येणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. कान आणि डोळ्यांना इजाही होऊ शकते. याकरिता रंग खेळताना डोळे आणि कानांची काळजी कशी घ्यावी, यासाठी पुढील टिप्सची मदत होईल.
- रंग खेळताना डोळ्यांच्या आजूबाजू्च्या त्वचेला तेल लावा. यामुळे डोळ्यांना लागलेला रंग सहज निघून जायला मदत होईल. याकरिता मोहरी किंवा नारळाचे तेल वापरू शकता. क्रीमचा वापर केल्यासही फायदा होईल.
- डोळ्यात रंग गेल्यावर बरेच जण पाण्याने डोळे धुतात, मात्र असे करू नका. कारण डोळ्यांना पाणी लावल्याने रंग पसरतो शिवाय डोळ्यांच्या समस्येत वाढ होऊ शकते. त्याऐवजी डोळ्यांत गेलेला रंग निघून जाण्यासाठी आयक्लिनर ड्रॉपचा वापर करा.
- डोळ्यात रंग गेल्यास डोळे अजिबात चोळू नका. डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा खाज येत असेल, तर डोळ्यात आयड्रॉप टाका. कॉटनच्या साहाय्याने हलक्या हाताने डोळे पुसून घ्या. डोळ्यात आयड्रॉप टाकल्याने रंग सहजपणे निघून जायला मदत होईल.
- खेळताना कॉण्टॅक्स लेन्स लावू नका, त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सवर रंग चिकटू शकतो.
- रंग खेळताना सनग्लासेस वापरू शकता जेणेकरून रंग डोळ्यात जाणार नाही.
रंगांपासून कानांची काळजी कशी घ्याल?
कानात तेल घाला. ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचे तेल कानात टाका आणि वरून कॉटन लावा. कॉटन फार आत जाईल असा लावू नका.
























































