महिंद्रा हाऊसिंग फायनान्सची 8 लाख 21 हजार रुपयांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहकर्ज घेतलेल्या कर्जदाराकडून कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल करूनही ती कर्जदाराच्या खात्यात जमा न करता तब्बल 8 लाख 21 हजार 300 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गणेश रामराव यादव याच्याविरुध्द चाकूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात चाकूर पोलीस ठाण्यात महिंद्रा होम फायनान्स शाखा चाकूरचे विधी अधिकारी नवनाथ प्रभाकर ढोणे यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे की, गणेश रामराव यादव (रा. तळेगाव घाट, ता. अंबाजोगाई, जि. बीड) हा वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होता. महिंद्रा होम फायनान्स प्रा. लि. शाखा चाकूर येथून गृहकर्ज घेतलेल्या कर्जदाराकडून त्यांना ठरवून दिलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल केली. मात्र, ती रक्कम संबंधित शाखेत कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा न करता कर्जदाराची आणि बँकेची 8 लाख 21 हजार 300 रुपयांची फसवणूक केली. म्हणून या प्रकरणी गणेश रामराव यादव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.