
गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या 2 हजार 578 तयार घरांची लवकरच लॉटरी काढण्यात येईल असे आश्वासन आज गिरणी कामगारांना देण्यात आले. तसेच सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अजून 176 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. ठाणे, पनवेलमध्ये गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी जमीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आज दिले.गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रलंबित प्रश्नावर म्हाडामध्ये गिरणी कामगार कृती संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली.
17 मे रोजी बैठक
एमएमआरडीएने गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांच्या देखभालीचा खर्च कोणी करायचा यासंबंधी निर्णय झालेला नाही. या विषयावर म्हाडा, एमएमआरडीएची संयुक्त बैठक राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत 17 मे रोजी घेण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुदत वाढवली
लॉटरी लागलेल्या यशस्वी कामगारांना पंधरवडय़ात देण्यात येणारे सूचना पत्र मुंबई बँकेत जमा करण्यासाठीची मुदत म्हाडाने तीन महिन्यांपर्यंत वाढवली आहे.
600 कामगारांना घरांचा ताबा
एमएमआरडीएच्या 2 हजार 417 घरांचा ताबा देण्याच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. एमएमआरडीएच्या घरांसाठी 600 कामगारांनी पैसे भरले आहेत. पण घरे मिळालेली नाही. हा विषय निकालात काढून पैसे भरलेल्या कामगारांना घरांचा ताबा देण्यात येईल. उर्वरित कामगारांना घरांच्या वितरणाची पत्रे वितरित करण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
अजून 176 हेक्टर जमिनीची गरज
सर्व 1 लाख 75 हजार कामगारांना घरे मिळावीत म्हणून अजून 176 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यासाठी ठाणे, पनवेलमध्ये जमिनीची पाहणी करून घरासांठी ती लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन योगेश म्हसे यांनी दिले. यावेळी गिरणी कामगार कृती संघटनेच्या जयश्री खाडिलकर, प्रवीण घाग, जयप्रकाश भिलारे, निवृत्ती देसाई पारकर उपस्थित होते.
























































