होमिओपॅथीही कोरोनावर प्रभावी; तज्ञ डॉक्टरांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील वर्षी कोरोनाच्या लाटेत होमिओपॅथीची मदत घेण्यात आली होती. साबुदाण्याच्या आकाराच्या होमिओपॅथीच्या सफेद गोळ्यांमुळे रुग्णाच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत यंदा होमिओपॅथी उपचार पद्धती काही प्रमाणात मागे पडली. पण अॅलोपॅथीच्या उपचाराला होमिओपॅथीची जोड दिल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकेल, असा विश्वास होमिओपॅथी क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत.

मागील वर्षीच्या कोरोनाच्या लाटेत मुंबईसह राज्यातील पोलिसांसाठी 1 लाख 70 हजार ‘आर्सेनिक अल्बम 30’ या गोळ्यांचे वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्याच्या गृह विभागाने आखला होता. या गोळ्यांच्या माध्यमातून पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सर्वसामान्यांनीही होमिओपॅथीच्या दुकानांबाहेर रांगा लावून सफेद गोळ्यांच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या. राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम पहिल्या लाटेत दिसून आले होते, मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत वैद्यकीय क्षेत्राने होमिओपॅथीला उपचार पद्धतीत सामावून घेतले नाही. होमिओपॅथी क्षेत्रातील तज्ञांच्या मते कोरोनावर मात करण्यासाठी अॅलोपॅथीच्या जोडीला होमिओपॅथी व आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीची जोड दिली तर कोरोनावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल. पण कोरोनाच्या दुसऱया लाटेचा मुकाबला करताना इतर पॅथीने होमिओपॅथीला व आयुषला बाजूला ठेवले. याची खंत होमिओपॅथीमधील डॉक्टरांना आहे.

कोरोना रुग्णांना झिंक, व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांसोबत आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचार दिल्यास रुग्णाच्या तब्येतीला आराम पडेल. मागील वेळेस आर्सेनिक औषध दिले होते. कोरोनाच्या दुसऱया लाटेत ब्रायोनिया किंवा जेल्सेनियम ही होमिओपॅथीमधील औषधे दिली तर कोरोनावर फायदेशीर ठरेल.
– डॉ. राहुल जोशी, होमिओपॅथी तज्ञ

मात्र लोक वैयक्तिक पातळीवर अजूनही होमिओपॅथीच्या गोळ्यांचे सेवन करीत आहेत, मात्र मागील वेळेस जेवढी जनजागृती होत होती तेवढी आता होत नाही. आयसीएमआरने होमिओपॅथीच्या डॉक्टरांना उपचार पद्धतीत सामावून घेणे गरजेचे आहे. कमी तीव्रता पिंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर होमिओपॅथीचे उपचार होत आहेत. केरळ सरकार, बंगालमध्ये सरकारच पुढाकार घेऊन लोकांना होमिओपॅथीच्या गोळ्या देत आहे, असे होमिओपॅथी क्षेत्रातील तज्ञ डॉ. राहुल जोशी सांगतात.