
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, नगर, पारितोषिकाचे स्वरूप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक; द्वितीय पुरस्कार अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरूप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक; तृतीय पुरस्कार एस.एस.शेवाळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहता, नगर-पारितोषिकाचे स्वरूप रोख चार लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात आले. यांच्यासह विविध महापालिका, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच शासकीय स्तरावरील अधिकाऱयांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा आपला राज्याचा लाडका मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख होतो तेव्हा त्याचे खरे श्रेय या प्रशासकीय यंत्रणेत समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाते. प्रशासनात काम करत असताना अनेक अडचणी येतात, आव्हाने समोर येतात. परंतु त्यातही काम करीत असताना नियमांची चौकट पाळून आपण सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठी किती चांगले काम करू शकतो हे लक्षात घेऊन जो काम करतो त्यातूनच चांगल्या प्रशासनाची सुरुवात होत असते. कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱयांनी काम केल्यामुळे या संकटाचा आपण मुकाबला करू शकलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाचे काwतुक केले.
‘सह्याद्री’ अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कारप्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





























































