चिनी कंपनी हिंदुस्थानी मोबाईल बाजारात पुन्हा घुसण्याच्या तयारीत

ओप्पो, विवो या कंपन्यांच्या मोबाईलसोबतच ऑनर (Honor) कंपनीचे मोबाईलही बाजारात उपलब्ध होते. मात्र अचानक या कंपनीचे मोबाईल दिसणं बंद झालं होतं. कारण या कंपनीने नवी उत्पादने बाजारात आणणं वर्षभरापासून बंद केलं होतं. ऑनर कंपनी ही चिनी कंपनी हुआवी (Huawei) कंपनीची उपकंपनी आहे. या ऑनर कंपनीने पुन्हा एकदा हिंदुस्थानी मोबाईल बाजारात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासाठी ऑनरटेक या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी Honor90 नावाचा मोबाईल बाजारात आणणार असून या मोबाईलचा कॅमेरा 200 मेगापिक्सेलचा असणार आहे.

Honor कंपनीसोबत Honortech कंपनी ही परवाना करार करणार आहे. Honortech कंपनीचे सीईओ माध्व सेठ यांनी म्हटलंय की या वर्षी त्यांची कंपनी मोबाईल बाजाराचा 4 के 5 टक्के हिस्सा काबीज करेल. याचाच अर्थ कंपनीचा महसूल हा 140 हजार कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.

माध्व यांनी सांगितले की आम्ही Honor सह परवाना करार करणार आहोत. हा परवाना मिळाल्यानंतर आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या गोष्टी करू शकू. यासाठी आम्हाला कोणतीही रॉयल्टी ऑनरला द्यावी लागणार नाही. माध्व सेठ यांनी Realme कंपनीतून राजीनामा दिला आहे आणि PSAV Global सोबत भागीदारातून HonorTech कंपनी सुरू केली आहे.

Huawei ने 2020 मध्ये Honor कंपनी विकली होती
Honor ब्रँड हा चीनी कंपनी Huawei चा एक भाग होता, ही कंपनी Huawei ने नोव्हेंबर 2020 मध्ये विकली होता. शेन्झेन झिक्सिन न्यू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला Honor कंपनी विकण्यात आली होती.