
सामना प्रतिनिधी । मुंबई
गणेशोत्सव काळात लालबाग-परळ भागातील गर्दी यात नावीन्य तसे काहीच नाही. तो अंगभूत प्रकार आहे. मात्र रविवारी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात गर्दीने जो काही धुडगूस घातला तो निश्चितच नवीन आणि चिंताजनक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला इव्हेंटचे रूप आले आणि तेव्हापासून ही गर्दी जमवण्याची स्पर्धा सुरू झाली. मंडळांना चिंता ‘मनी’ची अर्थात पैशांची सतावू लागली आणि मग कॉर्पोरेट कंपन्यांचा या इव्हेंटमध्ये आपसूकच शिरकाव झाला. त्या नादात उत्सवाची शान गेली. पाद्यपूजन, पाटपूजन, आगमन सोहळा असे फॅड दरवर्षी जन्माला येऊ लागले. गर्दी जमू लागली, पण धुडगूसही वाढला. कधीकाळी ही गर्दी हवीहवीशी वाटणारे लालबागकरच आता कंटाळलेत या गर्दीला.
दर मंगळवारी नाहीतर संकष्टीला पहाटे सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्री लोकलने दादर-प्रभादेवीला येणारे हजारो भक्त आहेत. मात्र त्यांच्या सोबतीने ट्रेनमध्ये येता-जाता धुडगूस घालणारे टोळकेही असते. अशीच एक-दोन-तीन टोळकी रविवारी लालबागच्या गर्दीत घुसली आणि सगळे बाप्पाच्या आगमनाचे चित्रच विस्कटले. लालबाग पुलाखालील सुशोभीकरणाची वाट लागली, गाडीच्या टपावरून बीभत्स नाच झाले, अनेकांचे मोबाईल चोरीला गेले, प्रचंड रेटारेटीत बाया-बापडय़ांसह अनेकजण गुदमरले. धुडगूस घालणारे हे गणेशभक्त असतीलच कसे, असा आता खर्या भक्तांचा सवाल आहे.
ही स्पर्धा जीवघेणी
गणेशोत्सव मंडळांची गर्दी जमवण्याची स्पर्धा लागली आहे हे मंडळाचे कार्यकर्तेही मान्य करतील. ज्याच्या दर्शनासाठी जास्त गर्दी त्याला जाहिरातींचा जास्त महसूल हे गणेशोत्सवाचे आताचे गणित आहे; पण ही गर्दीची स्पर्धा जीवघेणी ठरत आहे याकडे कोण लक्ष देणार, असा मुंबईकरांचा सवाल आहे. या स्पर्धेत उत्सवाचे पावित्र्य नष्ट तर होत नाही याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे एका ज्येष्ठ मुंबईकराने सांगितले.
हे फॅड आता बंद करा
गणेशोत्सवासाठी दरवर्षी काही ना काही फॅड, क्रेझ तयार होते आणि सोशल मीडियावर त्याचा मारा करून आमचाच खरा ‘राजा’ अशी दवंडी पिटली जाते. कुणी पाटपूजन करतो, कुणी पावतीपूजन, तर कुणी पाद्यपूजन. हे फॅड आता बंद करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी
कॉर्पोरेट कंपन्या यांनी गणेशोत्सवात शिरकाव केला तेव्हापासून या उत्सवाचे इव्हेंट झाले. या कंपन्यांच्या जाहिरातींसाठीच गर्दीची जमवाजमव सुरू झाली. त्यासाठी इव्हेंट मॅनेजरही नियुक्त होऊ लागले. सेलिब्रेटींना आणून उत्सवाची ‘शान’ वाढवण्याचेही प्रकार आता सुरू झाले आहेत. गर्दी जमविण्याचे शास्त्र आता मुंबईतील बहुतांश मंडळांना चांगलेच अवगत झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
लालबाग-परळचे दुखणे
रविवारचा धुडगूस हे प्रातिनिधिक आहे. एरव्हीसुद्धा उत्सव काळात गर्दीचा धसका लालबाग-परळ घेते. आगमन सोहळ्यावेळी तर गर्दी दुकानात घुसू नये म्हणून दुकाने किमान 5-6 तास बंद ठेवावी लागतात. या गर्दीतील बहुतांश चेहरे हे परिसरातील नसतातच. ते मुंबईबाहेरून ठाणे, डोंबिवली, भाइंदर येथून आलेले असतात. अंगावर ‘टी-शर्ट’ घालून मिरवणारी ही तरुणाई मग धुडगूस घालते हे ओघाने आलेच. मंडळाची ‘टी-शर्ट’ ही नवी क्रेझ बाजारात आली आहे. सोशल मीडियातून त्याचा पद्धतशीर प्रचार केला जातो आणि मंडळाच्या गंगाजळीत पैसा येतो, सोबत गर्दीही येते.
जखमींवर केईएममध्ये उपचार
चिंतामणीच्या गर्दीत जखमी झालेल्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार जखमींना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. तर गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असलेल्या सायली लोहार (18), श्वेता घाडीगावकर (22) या दोघांनी स्वतःहून डिस्चार्ज घेऊन अन्य रुग्णालयात उपचार सुरू केले.
गेल्या वर्षी आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी आणि नासधूस झाली होती. त्यानंतर आम्ही मंडळाला आगमन मिरवणूक शिस्तीत काढा, असे आवाहन केले होते. त्यानुसार या वर्षी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मंडळाकडून मुंबईकरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन घडलेले नाही. झालेली हुल्लडबाजी ही मंडळाला बदनाम करण्यासाठीच होती. –नरेश दहिबावकर अध्यक्ष, गणेशोत्सव समन्वय समिती
काही तुरळक ठिकाणी हुल्लडबाजी झाली, पण ते हुल्लडबाज आमचे कार्यकर्ते नव्हते. उलट कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वेळीच हे प्रकार थांबवले आणि ‘चिंतामणी’ निर्विघ्नपणे सोहळ्याच्या ठिकाणी पोहचले. गेल्या वर्षी अशीच काही बाहेरची मंडळी गर्दीत घुसली होती. या वर्षीही तेच होते. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास आमचे मंडळ निश्चितच यशस्वी झाले. पोलिसांच्या मदतीला दोन हजार कार्यकर्ते होते. – उमेश नाईक अध्यक्ष, चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळ




























































