महिला चाहत्याला मिठी मारणे पडले महागात, इराणी फुटबॉलपटू निलंबित

इराणी फूटबॉल लीगमध्ये खेळणाऱ्य़ा इस्तेगलाल एफसी टीमसाठी गोलकीपिंग करणाऱ्या खेळाडूला आपल्या महिला चाहत्याला मिठी मारणे महागात पडले आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लबने त्याच्यावर कारवाई करत त्याला निलंबित करण्याबरोबरच मोठा दंड ठोठावला आहे. होसेन होसेनी असे त्या खेळाडूचे नाव आहे. होसेन हा इराणमधील प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक आहे. 2022 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत त्याने इराणसाठी गोलकीपिंगही केले होते. याशिवाय त्याची इराणी लीगमधील अव्वल फुटबॉलपटूंमध्येही गणना होते.

इराणी फूटबॉल लीगमध्ये इस्तेगलाल एफसी आणि ॲल्युमिनियम असाक यांच्यात 12 एप्रिल रोजी सामना रंगला होता. या सामन्यानंतर इराणचा प्रसिद्ध फुटबॉलपटू होसेन होसेनीने आपल्या महिला चाहत्याला मिठी मारली. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला सामना संपल्यानंतर जबरदस्तीने स्टेडियममध्ये शिरताना दिसली. सुरक्षा रक्षक तिला रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच होसेनी तेथे आला. तो येताच त्या महिलेने होसेनीला मिठी मारली. होसेनीने महिलेला मिठी मारताच, मैदानावर उपस्थित असलेल्या रक्षकांनी लगेच दोघांना वेगळे केले. या घटनेनंतर इराणी क्लबने तिच्यावर कठोर कारवाई केली.

होसेनीला मिठी मारणारी महिला इराणी होती. ही महिला हिजाब न घालता मैदानात आली होती. दरम्यान, इराणमध्ये मुलींना हिजाबशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीला मिठी मारण्यास, स्पर्श करण्यास किंवा जवळ येऊ देण्यास मनाई आहे. त्यामुळे होसेनवर क्लबने कारवाई केली आहे. क्लबने त्याला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे आणि त्याच्यावर $4700 म्हणजेच अंदाजे 4 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.