
हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना भारती विद्यापीठ परीसरात घडली. आर्थिक कारणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संजय भरत सिनारे (वय 32) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हे चाकण येथे कामाला असताना नातेवाईकांकडे राहण्यास होते. मात्र लॉकडाऊनपूर्वी तेथुन ते बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी चाकण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संजय भारती विद्यापीठाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोरया मिसळ हॉटेलमध्ये कामाला लागले होते. काल संध्याकाळी हॉटेल मालक घरी गेल्यानंतर संजय हॉटेलमध्येच झोपला. रविवारी सकाळी मालकाने हॉटेल उघडले, तेव्हा संजयने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत हॉटेल मालकाने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.





























































